गडचिरोली :- अहेरी विधानसभा क्षेत्र अहेरी अंतर्गत येणाऱ्या आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पुलांचे बांधकाम सुरु आहे. यामुळे या मार्गावर असलेल्या गावातील नागरिकांना आवागमण करण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
अहेरी तालुक्यात अनेक विकास कामे सुरू आहे. आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड मार्गावर पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर पुलांचे बांधकाम पर्यायी रस्ते तयार न करताच सुरू करण्यात आले. यामुळे पावसाळ्यात या महामार्गावर असलेल्या नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी व आरोग्य सुविधेकरिता तालुका व जिल्हास्तरावर जाणे कठीण झाले आहे. त्याकरिता या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर पुलांचे व रस्त्यांचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्यायादीत टाकून संबंधीतावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. नागरिकांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर नियमानुसार कारवाही करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
सदर कंत्राटदारांनी येत्या १५ दिवसात कार्यवाही व पक्क्या रस्त्याची पर्यायीव्यवस्था करावी, अन्यथा १३ ऑगस्टपासून आलापल्ली सिरोंचा, आलापल्ली भामरागड, आलापल्ली अहेरी व आलापल्ली आष्टी या चारही मार्गावर काँग्रेसतर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलाडे, जि.प. माजी सदस्य अजय नैताम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी उपसरपंच अशोक येलमुले, राकेश सडमेक आदी उपस्थित होते.