देसाईगंज/कोंढाळा:-देसाईगंज तालुक्यातील मौजा कोंढाळा येथील वंश विजय भुते, वय-८ वर्ष, या लहान मुलाचे तलावात (गावतळा) बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक. २० जुलैच्या २०२४ रोजी घडली होती. नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या मृतकाच्या वारसास आमदार कृष्णा गजबे यांनी शासनाकडून तत्काळ अवघ्या चार दिवसांतच ४ लाखाचे धनादेश आज, दिनांक २४ जुलै २०२४ रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे आणि तालुका आपत्ती व्यवस्थापन देसाईगंजच्या तहसीलदार प्रीती डूडूलकर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील एका आठ वर्षीय मुलाचा गावतलावात मागील आठवड्याच्या शनिवार, दिनांक-२० जुलै रोजी बुडून मृत्यू झाला होता. वंश विजय भुते वय ८ वर्षे व घरा शेजारील तीन ते चार अल्पवयीन मुले त्यादिवशी दुपारच्या सुमारास गावालगत असलेल्या गावतळ्यात मासे पकडण्यासाठी गेले होते. काहीकाळ झाल्यानंतर सोबत असलेली मुले घरी परतली. मात्र, वंश हा एकटाच तलावाजवळ होता. अशातच गावातील काही नागरिक सतत पडणाऱ्या पावसामुळे गावतळा पाण्याने किती भरलेला आहे; हे पाहण्याकरिता गेले असता, तलावात एक मुलगा तरंगतांना दिसून आला होता. त्यातच तलावाजवळील पारीवर शालेय गणवेश आढळून आला होता. सदरची माहिती गावातील पोलीस पाटील किरणताई कुंभलवार यांना देण्यात आली होती. त्यानंतर पाण्यावर तरंगणाऱ्या मुलाला बाहेर काढले असता, त्याची ओळख पटली होती. त्यानुसार देसाईगंज तालुका आपत्ती व्यवस्थापन यांनी प्रकरणाची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करीत आज प्रत्यक्ष घरी जाऊन मृत मुलाचे वारस वडील विजय केवळराम भुते यांना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत शासकीय मदतीची रक्कम ४ लाख रुपये धनादेशाद्वारे वितरीत करण्यात आली.
धनादेश वितरीत करतेवेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते पंढरीजी नखाते, गावच्या प्रथम नागरिक सरपंचा अपर्णा राऊत, पोलीस पाटील किरणताई कुंभलवार, देसाईगंज तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून एन.एम. सुरपाम, एस.जी.वलथरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप वाघाडे, शेषराव नागमोती, गोकुल ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते अरूण कुंभलवार, पत्रकार नितेश पाटील प्रभाकर चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.