मूल प्रतिनिधी
मूल तालुक्यात मागील दोन-तीन दिवसापासून सतत पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील दाबगाव येथील मामा तलावाची पाळ फुटली. त्यामुळे तलावाचे पाणी शेतात शिरल्याने येथील धान पिकाचे मोठे नुकसान झाले. ही घटना 23 जुलै रोज मंगळवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली.
घटनेनंतर येथील तहसीलदार मृदुला मोरे आणि संबंधित अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित विभागाला पाणी ओसरल्यानंतर पंचनामा करण्याचे आदेश दिले. दाबगाव येथील मामा तलाव गावापासून लांब अंतरावर आहे. त्यामुळे तलावाचे पाणी गावात शिरले नाही. मात्र शेकडो हेक्टर शेतीमध्ये फुटलेल्या तलावाचे पाणी शिरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. मागील दोन दिवसात मूल तालुक्यात अतिवृष्टी झाली. जनजीवन विस्कळीत झाले. नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. तसेच तलावातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. तलावाची पाण्याची पातळी अपेक्षेप्रमाणे खूप वाढल्याने दाबगाव येथील तलावाची पाळ फुटली. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. तलाव गावापासून लांब असल्याने दाबगाव गावातील घरामध्ये पाणी घुसले नाही. त्यामुळे नागरिक सुरक्षित असून पिकांचे मात्र नुकसान झाले आहे. घटनास्थळी येथील तहसीलदार मृदुला मोरे यांनी जाऊन पाहणी केली. येथील संबंधित विभाग आणि पटवारी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे. पाणी ओसरल्यानंतर तलावाच्या पाण्यामुळे किती पिकांचे नुकसान झाले हे लक्षात येणार आहे.
” सततच्या अतिवृष्टीमुळे दाबगाव येथील तलाव तुडुंब भरला. त्यामुळे तलावाची पाळ फुटली. तलावाच्या परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरले आहे. पिके पाण्याखाली आली आहेत. गाव लांब असल्याने गावात मात्र पाणी घुसले नाही. नागरिक सुरक्षित आहेत. नागरिकांना या तलावापासून कोणताही धोका नाही. पाणी ओसरल्यानंतर आणि तलावाची पाळ बंद केल्यानंतर किती पिकांचे नुकसान झाले हे लक्षात येईल. संबंधित विभागाला आदेश दिले आहेत.”
– मृदुला मोरे, तहसीलदार, मूल.