गडचिरोली; जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातला आहे.आज (२१ जुलै ) रोजी सकाळपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अहेरीसह मुलचेरा तालुक्याचा देखील जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग सह अनेक रस्ते बंद झाले आहे. तर भामरागड तालुक्यात सह इतर तालुक्यात देखील पावसाचा पाणी शहरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाला आहे. अशात आज सकाळपासून दक्षिण भागात पावसाचा कहर बघायला मिळत आहे. त्यामुळे दक्षिण भागातील अत्यंत महत्त्वाचे असे अहेरी आणि मुलचेरा तालुक्याचा देखील जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.आलापल्ली ते आष्टी दरम्यान आणि मुलचेरा ते आष्टी दररम्यान वाहणारा दीना नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने रहदारी पूर्णपणे ठप्प झाली आहे.
चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार जलायश तुडुंब भरला असून दीना नदी धुतडी वरून वाहत आहे. कन्नमवार जलाशयाचा बॅक वॉटर परिसरातील बोलेपल्ली, हेटळकसा, पुल्लीगुडम,वेंगणुर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात साचला असून मुलचेरा ते एटापल्ली दरम्यान असलेल्या हेटळकसा पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग देखील बंद झाला आहे.सध्या मुलचेरा ते आष्टी दरम्यान कोपरअली जवळ पोलिसांनी बॅरिगेटस लावले असून या ठिकाणी तहसीलदार चेतन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांची टीम तैनात केली आहे.तर आलापल्ली ते आष्टी दरम्यान खमणचेरू जवळ असलेल्या दीना नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने येथे देखील दोन्ही बाजूंनी बॅरिगेटस लावून अहेरी पोलीस तैनात करण्यात आले आहे.गडअहेरी ते चेरपल्ली दरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्याने येथे देखील पोलिसांना तैनात केल्याचे अहेरीचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी कळविले आहे.
पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी पूल ओलांडू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.