गडचिरोली: घरासमोरील अंगणात खाटेवर झोपून असलेल्या व्यक्तीच्या अंगावर १ जून रोजी मध्यरात्री अज्ञात आरोपीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना २ जून रोजी अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा या गावात उघडकीस आली होती. चरणदास गजानन चांदेकर (४८) असे जळालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होते.अखेर शनिवार (२० जुलै) रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. गेल्या ५० दिवसापासून चरणदास चांदेकर यांची मृत्यूशी असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.
चरणदास गजानन चांदेकर यांच्यावर चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.काही दिवसांच्या उपचारानंतर चरणदास यांची प्रकृती बरी वाटत होती. चरणदास यांना आराम वाटत असल्याने त्याने जेवायला देखील सुरुवात केली होती.मात्र,अचानक त्यांची तब्येत पुन्हा खालावली.अखेर शनिवार (२० जुलै) रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मुलगा करण चांदेकर याने दिली.शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नेण्यात आले.मात्र उशीर झाल्याने शवविच्छेदन होऊ शकले नाही.
विशेष म्हणजे मागील ५० दिवसापासून खाजगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून आपल्या वडिलांना वाचविण्यासाठी मुलाने अनेक प्रयत्न केले.डॉक्टरांनी देखील शर्तीचे प्रयत्न केले.मात्र वडील चरणदास चांदेकर यांना वाचविण्यात अपयश आल्याची खंत देखील त्याने व्यक्त केले.चरणदास यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.एका मुलीचा आणि मुलाचा लग्न झालं.घरी एक मुलगी लग्नाची असून जमा केलेली तुटपुंजी उपचारासाठी खर्च करावं लागलं.त्यामुळे संसार उघड्यावर आले आहे.
वडील चारचाकी वाहन चालवायचे आणि मुलगा घरगुती कार्यक्रमात डेकोरेशन आणि डिजे वाजविण्याचा काम करायचा.प्रेमळ स्वभावामुळे कुठल्याही कार्यक्रमात चरणदास चांदेकर यांच्याकडील डेकोरेशन आणि डीजेची मोठी मागणी होती.त्याच मोहल्यातील हरिदास मुंजमकर यांचा डीजेचा धंदा मार खाल्ल्याने रागाच्या भरात चरणदास चांदेकर रात्री अंगणात झोपले असताना यांच्यावर पेट्रोल टाकून पेटविले.या घटनेची गंभीर दखल घेऊन रेपणपल्ली पोलिसांनी २४ तासातच हरिदास मुंजमकर नामक आरोपीला अटक केले हे विशेष.