गडचिरोली: पूर परिस्थितीमध्ये प्रसुतीकळा सुटल्यानंतर रुग्णालयात जाण्यासाठी जेसीबीच्या बकेटमध्ये बसून नाला ओलांडण्याची नामकी ओढवलेल्या झुरी संदीप मडावी या महिलेची प्रसूती झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
गुरुवारी (१८ जुलै) रोजी कुडकेली येथील झुरी संदीप मडावी या महिलेला प्रसूती काळा सुटल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यासाठी सांगितले होते. तेव्हा तिला घेण्यासाठी ताडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गेली होती. मात्र आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावरील कुडकेली जवळ असलेल्या नाल्यावरील वळण मार्ग वाहून गेल्याने रुग्णवाहिका कुडकेली पर्यंत जाऊ शकली नाही.गावातील आशा वर्कर संगीता शेगमकर यांनी गावकऱ्यांच्या मदतीने ३ किलोमीटर अंतरावरील नाल्यापर्यंत आणले.
सदर नाल्यावर रपटा नसल्याने आणि नाल्यात पाणी असल्याने त्या गरोदर मातेला नाला ओलांडणे कठीण होते. अशा परिस्थितीत तिथेच कामावर असलेल्या जेसीबीच्या बकेट मध्ये बसुन नाला पार करावा लागला होता. त्यानंतर तिला भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. जेसीबीच्या बकेटमध्ये बसून नाला ओलांडतानाचा व्हिडीओ चांगलाच समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता.
अखेर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी झूरीची साधारण प्रसूती झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.