गडचिरोली:अहेरी पोलिसांच्या वतीने शहरामध्ये कर्णकर्कश्य फटाक्यांचा आवाज करीत फिरणाऱ्या बुलेट दुचाकीवर त्याचबरोबर कागदपत्र नसलेल्या वाहनांच्या विरोधात तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांच्या विरोधामध्ये धडक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान कालपासून तब्बल 06 बुलेटवर फटाके फूटण्याचा आवाजाचे सायलेन्सर बसवल्या कारणाने कारवाईचा बडगा अहेरी पोलिसांतर्फे उगारण्यात आला आहे.त्याचबरोबर फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर व कागदपत्र नसलेल्या वाहनांवर देखील दंडात्मक कारवाई अहेरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्याकडून करण्यात येत आहे.
मागील काही दिवसापासून अहेरी व आलापल्ली शहरात बुलेटचा सायलेन्सर बदलवून कर्णकर्कश्य फटाक्यांचा आवाज करीत फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी भ्रमणध्वनीद्वारे अहेरीचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांना माहिती दिली. तेंव्हापासून अहेरी पोलिसांनी अशा टवाडखोर तरुणावर नजर ठेवली होती. अखेर एक-एक करत तब्बल सहा बुलेट धारकांवर त्यांनी कारवाई केली. एवढेच नव्हे तर सहा बुलेटचे सायलेन्सर काढून त्याच्यावर बुलडोजर चालविला आणि त्या सहा बुलेट धारकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे अहेरी व अल्लापल्ली शहरातील त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अहेरी पोलिस विभागाच्या या धडक कारवाईमुळे बेजबाबदारपणे चालविणाऱ्या दुचाकी धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्यामुळे बुलेट धारकांनी आपल्या बुलेटला कंपनीकडून मिळालेले साधेच सायलेन्सर बसवावे जेणेकरून कर्णकर्कश्य आवाजामुळे नागरिकांना याचा त्रास होणार नाही. व पोलिसांच्या कारवाईला देखील त्यांना सामोरे जावे लागणार नाही याची दखल घेण्याचे आवाहन अहेरी पोलिसांच्या वतीने वतीने दुचाकी धारकांना करण्यात आले आहे.तर यापुढे देखील अशाच पद्धतीने बेजबाबदार दुचाकी धारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.