गडचिरोली (महेश गुंडेटीवार)
जिल्ह्यातील दक्षिण भागात अत्यंत महत्वाचा म्हणून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गाची ओळख आहे. आलापल्ली ते भामरागड या (१३०-डी क्रमांकाच्या) राष्ट्रीय महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले.मात्र,रहदारीसाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित आणि मजबूत न केल्याने १६ आणि १७ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सदर पर्यायी मार्ग वाहून गेला. त्यामुळे दोन दिवसापासून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावर रहदारी पूर्णपणे बंद झाली आहे.याचा फटका थेट गरोदर मातेला बसला आहे.भामरागड तालुक्यातील कुडकेली येथील सौ झुरी संदीप मडावी या गरोदर मातेला अचानक प्रसूतीच्या कळा आल्याने तिला जेसीबीच्या बकेट मध्ये बसवून नाला ओलांडण्याची नामुष्की ओढवली.
प्राप्त माहितीनुसार भामरागड तालुका मुख्यालय पासून जवळपास १६ किलोमीटर अंतरावरील आणि बोटनफुंडी आरोग्य उपकेंद्रात समाविष्ट कुडकेली येथील सौ झुरी संदीप मडावी हिला १८ जुलै रोजी सकाळच्या सुमारास अचानक प्रसूतीच्या कळा सुरू झाले होते.ही माहिती येथील आशा संगीता शेगमकर यांनी बोटनफुंडी येथील सामुदायिक आरोग्य अधिकारी रीचा श्रीवास्तव यांना दिली.त्या तात्काळ ताडगाव आरोग्य पथक येथील रुग्णवाहिका घेऊन कुडकेली कडे निघाल्या.मात्र, राष्ट्रीय महामार्ग वरील कुडकेली लगत असलेल्या नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने रुग्णवाहिका कुडकिल्ली गावापर्यंत पोहोचू शकले नाही.त्यामुळे कुडकेली येथील आशा वर्कर संगीता शेगमकर यांनी गावकऱ्यांच्या मदतीने कसेबसे त्या गरोदर मातेला घेऊन ३ किलोमीटर वरील नाल्यापर्यंत पोहोचले.मात्र,नाल्याच्या पलीकडे रुग्णवाहिका असल्याने आणि नाल्यात पाणी असल्याने त्या गरोदर मातेला नाला ओलांडणे शक्य नव्हता.त्यामुळे गावकऱ्यांच्या मदतीने येथे असलेल्या जेसीबीच्या बकेट मध्ये बसवून तिला नदी ओलांडावा लागला.
एकीकडे प्रसुती कळा सुरू असल्याने असंख्य वेदना आणि दुसरीकडे जीवघेणा प्रवास अश्या परिस्थितीत कसेबसे आशा वर्कर आणि सामुदायिक आरोग्य अधिकारी तसेच गावकऱ्यांच्या मदतीने त्या गरोदर मातेला नाला ओलांडून रुग्णवाहिकेत बसविण्यात आले.कुडकेली नाल्यावरून जवळपास १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भामरागड तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात तिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने ती सुखरूप पणे ग्रामीण रुग्णालयात पोहोचली. प्रसूतीच्या कळा सुरू असताना जीवघेणा प्रवास झाल्याने तिच्या जीवाला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली होती.सध्या तिच्या प्रसूतीला वेळ असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता फोन उचलेना
मागील अनेक दिवसापासून या मार्गावर रहदारीसाठी अडचण निर्माण होत आहे. पुलाचे बांधकाम सुरू असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील रहदारी सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी मजबूत पर्यायी मार्ग करून देणे गरजे आहे.मात्र, सांबांधित कंत्राटदार थातूरमातूर रपटा तयार केल्याने दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने या नाल्याला पूर येऊन रपटा (पर्यायी मार्ग) वाहून गेला. त्यामुळे दोन दिवसापासून या राष्ट्रीय महामार्गावर रहदारी पूर्णपणे बंद आहे.
याविषयी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंताचे मत जाणून घेण्यासाठी गडचिरोली गाठले असता ते नागपूर गेल्याचे सांगण्यात आले.त्यांचा कॅबिन खाली होता. यापूर्वी देखील याच समस्यावर मत जाणून घेण्यासाठी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केले असता त्यांनी कॉल घेतला नाही.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारामुळे या परिसरातील जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे.
भामरागड तालुका मुख्यालयातील आठवडी बाजार होते बंद
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर राष्ट्रीय महामार्गावरील अनेक पुलांचे बांधकाम सुरू झाल्याने पहिल्याच पावसात रहदारीसाठी अडथळा निर्माण झाली होती. सध्या या भागात मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढत असल्याने थातुर्मातुर बनविण्यात आलेले रपटे वाहून जात आहेत.पुढे अजून पावसाळा बाकी असल्याने या रस्त्यावर नागरिकांचे मोठे हाल होणार आहे.सध्या या मार्गावर खाजगी वाहने आणि एसटी महामंडळची बस देखील बंद झाली आहे.
दर बुधवारला भामरागड तालुका मुख्यालयात आठवडी बाजार भरतो.मात्र,आलापल्ली आणि अहेरी वरून चारचाकी वाहन जाऊ न शल्याने आठवडी बाजार सुद्धा भरला नाही.