गडचिरोलीत पोलीस नक्षल चकमक, 12 माओवाद्यांना कंठस्नान
गडचिरोली:छत्तीसगढ सीमेजवळील वांडोली गावात 12-15 माओवादी तळ ठोकून असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर १७ जुलैला सकाळी 10 वाजता गडचिरोली येथून एक ऑपरेशन सुरू करण्यात आले ज्यामध्ये अपर पोलीस अधीक्षक यतिष देशमुख (ऑपरेशन) यांच्या नेतृत्वाखाली सात सी -60 पथकांना छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात पाठवण्यात आले.
त्यावेळी सदर परिसरात दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला आणि संध्याकाळी उशिरापर्यंत 06 तासांहून अधिक काळ चकमक सुरू होती. त्यानंतर परिसरात केलेल्या शोध मोहिमेत आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच 3 एके 47, 2 आयएनएसएएस , 1 कार्बाइन, 1 एस एल आर यासह 07 ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मृत माओवाद्यांपैकी एक ओळख पटली असून तो टिपागड दलमचा प्रभारी दवसाम डी वि सी एम लक्ष्मण आत्राम उर्फ विशाल आत्राम,असल्याची माहिती मिळाली आहे. अन्य माओवाद्यांची ओळख पेटविले जाणार आहे. चकमकीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
विशेष म्हणजे सहा तास चाललेल्या या चकमकीत एक पोलिस उपनिरीक्षक आणि सी -60 पथकातील एक जवानाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहे. तात्काळ त्यांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलविले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आज गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या वडलापेठ येथे स्टील प्रकलाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित होते. एकीकडे कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे छत्तीसगड सीमेवर पोलिस आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. त्यात गडचिरोली पोलीस दलाला खूप मोठा यश मिळाला आहे.
गृहमंत्र्यांनी जाहीर केले तब्बल 51 लाखांची बक्षीस
राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी आणि या मोठ्या अभियानासाठी सी -60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.