गडचिरोली : जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने दुर्गम भागातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत नागरिकांची निकड लक्षात घेता पावसाळ्यापूर्वीच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्राकरिता वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावे, याकरिता जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष विजय भाकरे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह व समितीने शिघ्रतेने कार्यवाही करत दोन दिवसातच कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखत घेवून लगेचच १९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.
आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने गावपातळीवर रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले होते. गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुशी सिंह ह्या रुजू झाल्यापासून आरोग्य आणि शिक्षण याकडे विशेष लक्ष देत आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न सुरू होते.ग्रामीण भागात आरोग्य अधिकारी उपलब्ध व्हावे यासाठी त्यांचे अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते.जिल्हा परिषद,गडचिरोली आरोग्य विभाग अतंर्गत ६ एम.बी.बी.एस.व १३ बी.ए.एम.एस अहर्ता धारक वैद्यकीय अधिक-यांच्या रिक्त पदाकरिता १८ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रत्यक्ष मुलाखात घेऊन थेट नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
यासाठी वृत्तपत्रात तसेच एन.आय.सी. व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशीत करण्यात आलेली होती. या पदभरतीकरिता गडचिरेाली, गोदिया, चंद्रपुर, नागपुर, भंडारा, अमरावती, यवतमाळ या जिह्यातील एम.बी.बी.एस. व बी.ए.एम.एस. शैक्षणीक अहर्ता धारक उमेदवार उपस्थीत होते. विशेष म्हणजे १९ जागांकरिता ८० अर्ज प्राप्त झाले होते. आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सेवा देण्यासाठी प्रथमच चांगला प्रतिसाद मिळाला.
गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे लक्षात घेता आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक असल्याने सदरची नियुक्ती प्रक्रिया तातडीने राबवण्यात आल्याची प्रतिक्रिया प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे आणि आयूषी सिंह यांनी दिली.
या प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाले नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी
येनाापूर, कारवाफा, पेंढरी, अडपल्ली, कसनसुर, रांगी, सावंगी, वैरागड, देवूळगाव, आमगाव, गट्टा, झिंगानूर, रंगय्यापल्ली, कमलापूर, कसनसुर, आरेवाडा, अंगारा, लगाम व फिरते आरोग्य पथक कोरची असे १९ प्राथमिक आरोग्य केंद्रावर नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सात दिवसात रूजू व्हावे अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द करून प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल, अशा सूचना नियुक्ती आदेशात देण्यात आल्या असल्याचे जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.