अहेरी:- गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून अनिमेष कुमार पराशर यांची सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.या निर्वाचन क्षेत्रातील विविध विधानसभा क्षेत्रात भेटी दिल्यानंतर त्यांनी सर्वाधिक अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील निवडणूक व्यवस्थेची पाहणी करतानाच सुरू असलेल्या प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केले.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच १९ एप्रिल रोजी गडचिरोली-चिमूर क्षेत्रात मतदान होणार असून प्रशासन सज्ज झाले आहे.या निर्वाचन क्षेत्रात एकूण ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून तेलंगाणा आणि छत्तीसगड या दोन राज्यांची सीमा लागून असलेल्या तसेच सर्वाधिक अति संवेदनशील अश्या अहेरी विधानसभा क्षेत्रात निवडणूक व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागेपली येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी येथील स्ट्रॉंग रूम ईव्हीएम साठवणूक कक्ष तसेच मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची पाहणी केली.तर अहेरी विधानसभा क्षेत्रातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेऊन मतदानाच्या दिवशी मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.
जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी सुद्धा मतदान पथकांच्या दुसऱ्या प्रशिक्षणात मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी कायदा व सुव्यवस्था निरीक्षक राजपाल सिंह, निवडणूक खर्च निरीक्षक एस वेणूगोपाल, जिल्हाधिकारी संजय दैने,निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जिवने, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख तसेच पाच तालुक्यातील तहसीलदार उपस्थित होते.