गडचिरोली:दोन दिवसांपासून तेलंगाणा राज्यात धुमाकूळ घालत दोन शेतकऱ्यांचा बळी घेणारा रानटी हत्ती अखेर प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीतील अहेरी तालुक्यात समाविष्ट वट्रा जंगल परिसरात दाखल झाला आहे. वनविभागाचे कर्मचारी नजर ठेवून असले तरी सीमावर्ती भागातील गावांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मुलचेरा तालुक्यातील नागुलवाही गावाजवळून वाहणाऱ्या प्राणहिता नदी ओलांडून रानटी हत्तीने तेलंगाणा राज्यात प्रवेश केला.कुमरमभीम जिल्ह्यातील चिंतलामानेपल्ली तालुक्यात समाविष्ट बुरेपल्ली येथे मिरचीच्या शेतात काम करणाऱ्या अल्लूरी शंकर शेतकऱ्यावर हल्ला करत ठार केले.या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच ४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या शेतात भात पिकाला पाणी घालत असलेल्या कारू पोशन्ना नामक शेतकऱ्यांवर त्या रानटी हत्तीने हल्ला करत ठार केले. अवघ्या २४ तासात दोन शेतकऱ्यांचा बळी गेल्यावर नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात होता.परत जीवितहाणी होऊ नये म्हणून वन विभाग सतर्क झाले आणि महसूल विभागाच्या मदतीने जवळपास ७० कर्मचारी त्या रानटी हत्तीच्या हालचालीवर नजर ठेवले होते.
तेलंगाना राज्यातील बेजुर आणि चिंतलमानेपल्ली तालुक्यातील काही गावात त्या हत्तीचे दर्शन झाले. प्राणहिता नदीच्या काठावर असलेल्या जंगलात हत्ती आढळून आल्याने प्राणहिता नदी ओलांडून परत गडचिरोली जिल्ह्यात दाखल होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात होता.अखेर शुक्रवार (५ एप्रिल) रोजी रानटी हत्तीने अहेरी तालुक्यातील वट्रा जंगल परिसरात दाखल झाला आहे.
हा परिसर सिरोंचा वन विभागातील रेपणपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असून येथील अधिकारी व चमू या परिसरात त्या रानटी हत्तीचा शोधत घेत असलेतरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.