अहेरी:एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले असून कार्तिक राजाभाऊ तोरेम आणि कुमारी शिवानी अरुण नैताम या दोन विद्यार्थ्यांचे जवाहर नवोदय विध्यालयात निवड झाली आहे.यासाठी तत्कालीन प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी विशेष प्रयत्न केले होते.आज ते इथे नसले तरी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
आश्रम शाळेतील विध्यार्थी कुठल्याही स्पर्धा परीक्षेत मागे राहू नये या उदात्त हेतूने तत्कालीन प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांच्या संकल्पनेतून शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना शासकीय आश्रम शाळा खमनचेरु येथे एकत्रित करून विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले. प्रकल्पातीलच उत्कृष्ट शिक्षकांकडून या सर्व विद्यार्थ्यांचा परीक्षाभिमुख सराव घेऊन स्पर्धा परीक्षेबाबतची माहिती देण्यात आली. २० जानेवारी रोजी नवोदय विद्यालयची प्रवेश परीक्षा झाली. ३१ मार्च रोजी निकाल जाहीर झाला असून त्यात शासकीय आश्रम शाळा बामणी येथील कार्तिक राजाभाऊ तोरेम व अनुदानित आश्रम शाळा लगाम येथील कुमारी शिवानी अरुण नैताम या विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून अहेरी प्रकल्प कार्यालयाची मान उंचावली आहे.त्यामुळे सर्व स्तरावरवून त्यांचे कौतुक केले जात आहे.
विध्यार्थ्यांची सराव परीक्षा,ज्यादा वर्ग आणि योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी सुहास वसावे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) व सूर्यभान डोंगरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) यांनी वारंवार भेटी देऊन विशेष लक्ष दिले होते.तर ज्यादा वर्ग घेऊन विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. दीपक वाघाडे, प्रशांत गुरु, दत्तात्रय सूर्यवंशी, खुशाल दिवसे, प्रसाद चिमरालवार, वैभव वैरागडे, देवाजी कस्तुरे,मजहर खान व विनोद मुळावर यांनी अथक परिश्रम घेतले.
दरवर्षी उपक्रम सुरू राहणार
रवींद्र ठाकरे, अप्पर आयुक्त, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षापासून भविष्यवेधी शिक्षण प्रणाली आश्रम शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत झालेली आहे.सहसा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची नवोदय मध्ये निवड होत नाही.मात्र,तत्कालीन प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांच्या संकल्पनेतून तसेच प्रयत्नातून पहिल्यांदाच आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय साठी निवड झाली आहे.त्यामुळे शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.विद्यमान प्रकल्प अधिकारी आदित्य जिवने यांनी शिक्षक व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा देऊन सदर उपक्रम दरवर्षी सुरू ठेवण्याचे सूचना दिले आहे.