गडचिरोली: स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना टिकविण्यासाठी इंग्लिश मीडियमच्या खाजगी शाळांमध्ये टाकण्याकडे पालकांचा कल वाढला आहे.परिणामी जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या घटत असून अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याचा मार्गावर आहेत.अश्याही परिस्थितीत शिक्षकांची महत्वाची पदे रिक्त असताना,शाळेतील पटसंख्या कमी होऊ न देता उत्कृष्ट व होतकरू विध्यार्थी घडविण्याचा काम एका जिल्हा परिषद शाळेकडून केला जात आहे.येथील विद्यार्थिनी कुठलीही परीक्षा असो अग्रेसर राहतात. दरवर्षी येथील बरेच विध्यार्थीनी नवोदय विद्यालयची परीक्षा उत्तीर्ण होतात.यंदाही येथील उपक्रमशील शिक्षकांनी ही परंपरा कायम राखली असून तब्बल ५ विद्यार्थिनींची नवोदय विद्यालय साठी निवड झाली आहे.त्यामुळे ‘या’ शाळेची जिल्ह्यात डंका वाजत आहे.
चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कुनघाडा केंद्रातील कुनघाडा (रै) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळेत पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण दिले जाते.या शाळेची पटसंख्या २३१ एवढी असून याठिकाणी केवळ ६ शिक्षक कार्यरत आहेत.विशेष म्हणजे मागील दोन वर्षांपासून उच्च श्रेणी मुख्याध्यापक आणि पदवीधर प्राथमिक शिक्षकाचे पद रिक्त आहे.२०१८ मध्ये रुजू झालेल्या ५ शिक्षकांनी या शाळेची कायापालट करून दाखवली आहे.शिष्यवृत्ती परीक्षा,मॉडेल स्कुल परीक्षा,नवोदय प्रवेश परीक्षा तसेच आदी कुठलीही परीक्षा असो येथील विद्यार्थिनीं जिल्ह्यात अग्रेसर असतात. त्यामुळे या शाळेची जिल्ह्यातच वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
मागील २० जानेवारी रोजी नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा झाली.त्याचा निकाल ३१ मार्च रोजी जाहीर झाला.त्यात कुनघाडा (रै) येथील अक्षरा विजय दूधबावरे, आराध्या प्रवेश मेश्राम, खुशी नीलकंठ टिकले, समृद्धी रवींद्र कुनघाडकर, क्रिष्टी श्रीनिवास बंडमवार यांनी घवघवीत यश प्राप्त करत नवोदय विद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे. विशेष म्हणजे सलग चार वेळा यशस्वी हॅट्रिक नंतर यावर्षी तब्बल पाच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पास केली आहे.
या शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती बघता गावातील पालकवर्ग सुद्धा आपल्या पाल्यांना कुठल्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत किंव्हा कॉन्व्हेंट ला न पाठवता गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतच दाखल करतात. सत्राच्या सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी, जादा वर्ग, रात्र कालीन वर्ग, पहाटेच्या गृहभेटी, पूरक मार्गदर्शन, प्रत्येक आठवड्यात चाचणी,प्रत्येक आठवड्यात सराव, विविध शैक्षणिक व्हिडिओ, माता-पालकांचे मार्गदर्शन पर सत्र असे विविध उपक्रम राबविले जातात.त्यामुळे येथील विद्यार्थी शिक्षणात पुढे असल्याचे दिसतात.विद्यार्थ्यांसोबतच
येथे कार्यरत शिक्षक निमाई मंडल, रोशन बागडे,गौतम गेडाम,वर्षा गौरकर,रेखा हटनागर,प्रीती नवघडे,विलास मेश्राम यांचे देखील कौतुक केले जात आहे.
५ वर्षात एकूण १८ मुलींची यशाला गवसणी
शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये १) गायत्री महावीर गव्हारे, २) मनीषा सुरेश वासेकर, ३) धनश्री रामचंद्र काटवे, ४) संस्कृती हंसराज दुधे शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये १) संस्कृती गणेश दुधबळे, २) उन्नती देवानंद बांबोळे, ३) पौर्णिमा नामदेव नैताम, ४) गोजिरी जगन्नाथ चौधरी शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये १) अपूर्वा संतोष गव्हारे २) ज्ञानी किशोर कुकडे ३) अंशीता संतोष वडेट्टीवार ४) विशाखा विजय कुकडे शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये १) पूजा सूर्यभान वाघाडे यांनी स्थान पटकावले होते.यावेळी सुद्धा शाळेने यशाची परंपरा कायम राखत आपले ५ स्थान निश्चित केले आहेत.