अंबेजोगाई :- लग्नासाठी बस्ता बांधून बहिण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या भावी नवरदेव तरूणाच्या दुचाकीला एसटीने धडक दिली. या भीषण अपघातात भावी नवरदेव तरूणासह त्याची बहिण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अंबाजोगाई जवळ वाघाळा पाटीजवळ रविवारी दिनांक 31 मार्च 2024 रोजी सायंकाळी सात वाजता घडला आहे.
लातूर जिल्ह्यातील बिटरगाव तांडा (रा. रेणापुर) येथील सेवालाल पंडित राठोड (वय 21) या तरूणाचा येत्या 28 एप्रिल रोजी विवाह होणार होता. या विवाहाची सध्या जय्यत तयारी सुरू होती. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सेवालाल रविवारी त्याची राडी तांडा (ता. अंबाजोगाई) येथील बहीण दिपाली सुनिल जाधव (वय 20 ( आणि वर्षाची भाची त्रिशा यांना घेवून अंबाजोगाईला आला होता.
लग्नाचा बस्ता बांधून बहिण आणि भाचीला घेवून सेवालाल सायंकाळी दुचाकीवरून परत गावाकडे निघाला होता. ते वाघाळा पाटीजवळ आले असता समोरून येणाऱ्या लातूर-छत्रपती संभाजीनगर बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण आपघातात बसखाली दुचाकी फरफटत जावून सेवालाल, बहिण दिपाली आणि भाची त्रिशा यांचा जागीच मृत्यू झाला.
सेवालाल आणि दिपाली हे त्यांच्या मातापित्यांचे एकुलते एक अपत्य होते. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी स्वराती रूग्णालयात धाव घेतली. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश पाहून अनेकांची मने हेलावली.