गडचिरोली:- पोलिसांचा खबरी असल्याचे सांगत माओवाद्यांनी एका आदिवासी इसमाची हत्या केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे.अशोक तलांडी (रा.दामरंचा,ता.अहेरी) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावरील ताडगाव वरून जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतरावर अशोक तलांडी यांचा मृतदेह आढळून आला आहे. विशेष म्हणजे मृतदेहाजवळ काही पत्रके आढळून आले असून त्यात अशोक हा पोलिसांचा खबरी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.अशोक तलांडे याला अनेकदा सुधारण्याची संधी दिली होती.त्याच्या घरच्यांना आणि नातेवाईकांना सुद्धा सुधारण्यास सांगण्यात आले.मात्र तो सुधरला नाही.त्यामुळे जनता अदालत मध्ये त्याला सजा देण्यात आली असून याला जीमेदार एक ठाणेदार असल्याचा उल्लेख देखील त्या पत्रकात करण्यात आला आहे.
अशोक तलांडे हा मूळचा दामरंचा येथील रहिवासी असला तरी तो मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नी सोबत भामरागड तालुक्यातील ताडगाव परिसरात राहत होता.अशोक हा अत्यंत गरीब असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचा. त्याच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असल्याची माहिती आहे.नेमकं सदर व्यक्ती केंव्हापासून घरून गायब आहे याची माहिती कळू शकली नाही.मात्र,अशोक तलांडे हा पोलिस खबरी नसल्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले आहे.या घटनेचा तपास ताडगाव पोलीस करीत असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशत निर्माण झाली आहे.
*घटनास्थळी आढळले पत्रक*
माओवादी कोऱ्या कागदावर लाल रंगाने लिहिलेले पत्रक वापरतात. मात्र, घटनास्थळावर आढळलेले पत्रक हे वहीच्या पानावर लिहिलेले होते.बाल पेनी ने लिहिले पत्रकात खाली पेरमिली एरिया कमिटी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) मार्च 2024 असा उल्लेख आहे.