गडचिरोली:- जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठेची केलेली गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अखेर अशोक नेते यांना मिळाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत खासदार अशोक नेते यांना सुद्धा हॅट्रिकची संधी राहणार आहे.
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी कडून डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले.तर महायुती मधून विद्यमान खासदार अशोक नेते, अजित पवार गटाचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यात उमेदवारीसाठी काटे की टक्कर बघायला मिळत होती. दोन्ही नेते मुंबई, दिल्लीत तळ ठोकून बसले होते.अखेर नामांकन अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस अगोदर विद्यमान खासदार अशोक महादेव नेते यांनाच उमेदवारी देण्यात आली.
भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी अशोक महादेवराव नेते यांना उमेदवारी दिली आहे.आता महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये थेट लढत होणार असून डॉ.नामदेव किरसान विरुद्ध अशोक नेते अशी लढत बघायला मिळणार आहे.मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती.मात्र,अखेर भाजपने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटाला) न सोडता आपल्याकडेच ठेवलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अबकी बार चार सौ पार’ म्हणत हॅट्रिक करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांच्यासोबतच गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात अशोक नेते यांना हॅट्रिकची संधी आहे.दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेस कडे असून त्यांनी डॉ नामदेव उसेंडी यांना उमेदवारी न देता डॉ नामदेव किरसान यांना संधी दिली आहे. काँग्रेसला भाजपचा विजयरथ रोखण्यात यश येणार का ? याकडे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
अशोक नेते हे २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोनदा विजयी झाले.त्यांनी डॉ नामदेव उसेंडी यांचा पराभव केला होता.काँग्रेसने यंदा आपला उमेदवार बदलला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ नामदेव किरसान यांना उमेदवारी दिल्याने याठिकाणी महत्वपूर्ण लढत बघायला मिळणार आहे.