गडचिरोली:जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर येथील शासकीय हत्तीकॅम्प मध्ये राणी नावाच्या हत्तीनीने होळीच्या पर्वावर (२४ मार्च) रोजी एका मादी पिलास जन्म दिला त्यामुळे या शासकीय हत्ती कॅम्प मधील हत्तींची संख्या नऊ झाली आहे.यापूर्वी येथे एकूण आठ हत्ती होते.
रविवारी (२४ मार्च) रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास राणी या हत्तीणीने मादी पिलास जन्म दिला.याची माहिती मिळताच सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक पूनम पाटे यांनी भेट देऊन पाहणी केली.राणी नामक हत्तीण व तिच्या पिलाची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्याची प्रकृती उत्तम असल्याचे कळते.राणी आणि अजित हत्तीचे हे अपत्य असून या शासकीय हत्तीकॅम्प मध्ये आता आणखी एका हत्तीची भर पडली आहे.
सिरोंचा वन विभाग अंतर्गत येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्तीकॅम्प हे राज्यातील एकमेव हत्तीकॅम्प म्हणून प्रसिद्ध आहे.याठिकाणी अजित,गणेश, बसंती, मंगला, प्रियांका,रूपा,राणी आणि लक्ष्मी नावाच्या दोन नर आणि सहा मादी असे एकूण आठ हत्ती आहेत.दरवर्षी याठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते.विविध राज्यातील पर्यटक याठिकाणी असलेल्या हत्तीकॅम्पला भेट देत असतात.होळी पौर्णिमेच्या दिवशी राणी नामक हत्तीणीने एका मादी पिलास जन्म दिल्याने आता याठिकाणी हत्तींची संख्या नऊ वर पोहोचली आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
अजित आणि राणीचे अपत्य
अजित हत्ती हे महालिंगा आणि व बसंतीचे अपत्य असून ७ जुलै १९९४ ला त्याचा जन्म याच हत्तीकॅम्प मध्ये झाला.अजित सध्या ३० वर्षाचा आहे.तर राणी नामक हत्ती हे अजित आणि मंगलाचे अपत्य आहे.१० मार्च २००८ रोजी राणी हत्तीचा जन्म याच हत्तीकॅम्प मध्ये झाला होता.राणी आता १६ वर्षाची असून त्याचा हा पहिला खेप आहे. विशेष म्हणजे या हत्ती कॅम्प मधील अजित नामक हत्तीचे सर्वात जास्त अपत्य आहेत.आता परत एक मादी हत्तीची भर पडली असून अजित आणि राणी हत्तीचे हे अपत्य आहे.