गडचिरोली : (डॉ विष्णू वैरागडे)
हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांची गडचिरोलीत जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. सोमवारी त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.
हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये दोन वर्षापुर्वी रूजू झालेल्या दैने यांनी जिल्हयात मोठी कामे केली आहेत. आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी त्यांनी प्रयत्न केले. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये ईसीजी मशीन व इतर अत्याधुनिक यंत्र उपलब्ध करून दिली आहेत. या शिवाय अंगणवाड्यांमधून आहार शिजविण्यासाठी होणारी इंधनाची अडचण लक्षात घेऊन या अंगणवाड्या धुरमुक्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार 900 पेक्षा अधिक अंगणवाड्यांमधून 15 व्या वित्त आयोगातून गॅस सिलेंडर देऊन या अंगणवाड्या धुरमुक्त केल्या आहेत.
या शिवाय वृक्षलागवड योजनेमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम झाले आहे. ग्रामपंचायत, शाळा, पंचायत समिती, अंगणवाडीच्या परिसरात वृक्षलागवडीला प्रोत्साहन दिले. कळमनुरी पंचायत समिती इमारतीचे कामही त्यांच्याच काळात पूर्ण झाले आहे. तर हिंगोली पंचायत समितीची जागेची अडचण लक्षात घेऊन नवीन इमारतीचा प्रस्ताव शासनस्तरावरून मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे लवकरच हिंगोली पंचायत समितीची इमारत उभी राहणार आहे. या सोबतच स्वच्छ भारत मिशनमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमधून सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी गावपातळीवर भेटी दिल्या आहेत. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जल जिवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनेची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी त्यांनी वेळोवेळी भेट देऊन पाहणी केली. घरकुल योजनेची कामे गतीमान करून लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांची आता गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
*****