गडचिरोली :आदिवासी समाजक्रांतीचे जनक व आद्य क्रांतीकारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या जीवनप्रवासाचा उलगडा आज बिरसा मुंडा महानाट्यातून महासंस्कृती महोत्सवात सादर करण्यात आला. या महानाट्याचा प्रेक्षकांनी आनंद घेतला.
सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पटांगणात सुरू असलेल्या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या तीसऱ्या दिवशी बिरसा मुंडा हे महानाट्य सादर करण्यात आले.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मस्तोळी, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे, नायब तहसिलदार संगीता धकाते व ज्योती तायडे तसेच विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
बिरसा मुंडा यांच्या जीवनप्रवास सांगणाऱ्या या महानाट्याची निर्मिती लोकजागृती संस्था चंद्रपूर यांची होती. लेखन चुडाराम बल्लारपुरे यांचे तर दिग्दर्शन अनिरुद्ध वनकर यांचे होते. संगीत लोकेश दुर्गे, ईश्वर खोब्रागडे व चेतन रामटेके यांचे, नेपथ्य हरेंद्र आणि प्रकाश योजना सौरभ मेश्राम यांची होती. कलावंत निखिल मानकर, भारत रंगारी, संजीव रामटेके, रूपाली खोब्रागडे, राणी मेश्राम, प्रवीण भसारकर, जुगल गणवीर, विजय गुरुनुले, पिंटू खोब्रागडे, अमित दुर्गे, स्नेहल वाटगुरे, गुरु मोहुर्ले, मयूर मस्के, शुभम गुरनुले, अंकुश शेडमाके, किशोर सातपुते, अभिषेक मोहुर्ले, प्रियंका गेडाम, प्रवीणा लाडके, संजना येरमेकर या झाडीपट्टीच्या कलाकारांनी आपल्या अभिनयातून बिरसा मुंडा यांचे जीवनचरित्र साकारतांना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
बिरसा मुंडा यांच्या बालपणापासून त्यांच्या जीवनाच्या अखेरपर्यंतचे क्षण महानाट्यातून साकारण्यात आले. त्यांचे बालपण, शिक्षण, आदिवासी समाजाला एकत्र करून उभारलेले ‘उलगुलान’ आंदोलन, सर्वसामान्य जनतेवरील अन्याय करणाऱ्या इंग्रज अधिकारी, ठेकेदार, जमीनदार, सावकार यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा, ब्रिटिश कायद्यांविरूद्ध विद्रोह व लढाई महानाट्यातून सादर करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या महानाट्याला हौशी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.