गडचिरोली : केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय बालक्रीडा स्पर्धांच्या नियोजनात हयगय तसेच शासनाच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी चामोर्शी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (शिक्षण) तथा मुलचेराचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी नेताजी मेश्राम यांना निलंबित केले आहे.सीईओ आयुषी सिंह यांच्या या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
मुलचेरा पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी गौतम मेश्राम ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर ऑक्टोबर २०२३ पासून नेताजी मेश्राम यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मुलचेरा या पदाचा प्रभार सोपविण्यात आला होता. मात्र, प्रभारी गटशिक्षणाधिकारी नेताजी मेश्राम यांनी माहे जानेवारी २०२४ पासून सुरू असलेल्या केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय बालक्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने योग्य ते नियोजन केले नाही. प्रत्यक्षात केंद्रस्तरीय स्पर्धेदरम्यान उपस्थित झाले नाही. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या शासनाच्या महत्वाकांक्षी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुद्धा केलेली नाही. तसेच मागील १५ दिवसांपासून कार्यालयात उपस्थित नसल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यामुळे सीईओ सिंह यांनी नेताजी मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. नेताजी मेश्राम यांना निलंबन कालावधीत सिरोंचा पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे.
आयुषी सिंह यांनी गडचिरोली येथे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य आणि शिक्षण याकडे विशेष लक्ष दिले आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अहेरी, मुलचेरा, भामरागड, एटापल्ली व सिरोंचा या तालुक्यांमध्ये त्यांचे विशेष लक्ष असून अगदी अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतींकडे विशेष लक्ष राहिले आहे.अगदी ग्राउंड झिरोवर जाऊन काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. या कारवाई मुळे कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली हे विशेष.