गडचिरोली:राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोरोनानंतर पहिल्यांदाच शालेय बालक्रीडा तसेच अधिकारी, कर्मचारी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक संमेलन होत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.यापुढे देखील विविध क्रीडा स्पर्धा होणार असून त्याअनुषंगाने आज पेटवलेली मशाल केवळ एका क्रीडा स्पर्धेपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक खेळाडूने वर्षभर ती स्वत:च्या मनात धगधगती ठेवावी, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वतीने ७ फेब्रुवारी रोजी आयोजित जिल्हास्तरीय शालेय बालक्रीडा, अधिकारी,कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ.कृष्णा गजबे, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ.डॉ देवराव होळी,पद्मश्री परशुराम खुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह,उपजिल्हाधिकारी ओंकार पवार,गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी राहुल मिणा,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार,जि.ग्रा.वि. य. गडचिरोलीचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के,जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख तसेच अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्तगुण दडलेले असून या माध्यमातून ते बाहेर काढण्याची ही मोठी संधी आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.एवढेच नव्हेतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचा विशेष उल्लेख करत पालघर मध्ये असताना त्यांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रत्येक आदिवासींच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे काम केले.अल्प कालावधीतच त्यांनी पालघर सारख्या ठिकाणी आपले नावलौकिक केले. गडचिरोली जिल्हा सुद्धा आदीवासीबहुल जिल्हा असून त्यांच्याकडून अश्याच कामाची अपेक्षा असल्याचे मत त्यांनी व्यक्त करतानाच शासनाकडून पूर्णपणे सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली.शालेय बालकला, क्रीडा व सांस्कृतिक समेलनाकरिता केंद्र,तालुका आणि जिल्हा स्तरावर निधी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून जिल्हा परिषदेच्या नवीन इमारती करिता सुद्धा आवश्यक निधीची पूर्तता करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी आपल्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील बाराही तालुक्यातून आलेल्या विध्यार्थी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती देतानाच त्यांनी टीम स्पिरिटच्या भावनेतून खेळ खेळल्यास नक्कीच यश प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन केले.एवढेच नव्हेतर प्रशासनाच्या कामात देखील हीच स्फूर्ती आणि टीम स्पिरिट असेल तर प्रत्येक कामात नक्कीच यश प्राप्त होईल त्यामुळे सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात छोट्याश्या कर्मचाऱ्यापासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची भूमिका महत्त्वाची असून जिल्ह्याच्या विकासात सर्वांनी योगदान देऊ या,असे देखील त्यांनी आवाहन केले.
विशेष म्हणचे ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या जिल्हा स्तरीय बालक्रीडा,अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे योग्य असे नियोजन करण्यात आले असून मोठ्या उत्साहात क्रीडा व सांस्कृतिक संमेलन पार पडणार आहे.क्रीडा स्पर्धा आयोजित ठिकाणी सेल्फी पॉईंट देखील तयार करण्यात आले असून सर्वांना आकर्षित करत होते.
क्रीडाकौशल्य व कलागुणांना मिळणार वाव
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या विध्यार्थी,अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्य आणि कला गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.विशेषतः यामध्ये कबड्डी,खो-खो,व्हॅलीबॉल, रस्सीखेच असे सांघिक खेळ आणि वयक्तिक खेळांचा समावेश केला आहे. त्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमातून कला गुणांना वाव मिळणार असून अधिकारी व कर्मचारी यांच्या दैनंदिन कामकाजातुन सुटका होऊन ताणतणाव कमी होईल आणि नवीन ऊर्जा मिळेल एवढेच नाहीतर जिल्हाभरातील विविध तालुक्यातील विध्यार्थी आणि अधिकारी,कर्मचारी यांच्यामध्ये एकोपा निर्माण होण्यास मदत होणार आहे.