गडचिरोली:- शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना धानोरा तालुक्यातील सोडे येथे घडली आहे. जवळपास 100 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचारार्थ हलविल्याची माहिती समोर येत आहे.
धानोरा तालुक्यातील सोडे या गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या माध्यमातून शासकीय मुलींची आश्रम शाळा चालविली जाते.याठिकाणी केवळ मुलींसाठी आश्रम शाळा असून धानोरा तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील जवळपास ३८० आदिवासी मुली निवासी स्वरूपात शिक्षण घेतात.बुधवार (२० डिसेंबर) रोजी नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थिनींना दुपारच्या सुमारास जेवण देण्यात आले. आलू,गोबी,वरण भात याचं भोजन केल्यानंतर काही वेळाने विद्यार्थिनींच्या पोटात दुखने, काहींना चक्कर येणे तर मळमळ वाटणे सुरू झाले. याची तक्रार विद्यार्थिनींनी शाळेच्या शिक्षकांकडे केली.
लगेच येथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी रुग्णवाहिका बोलावून तब्बल 100 पेक्षा अधिक विद्यार्थिनींना धानोरा तालुका मुख्यालयात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.याची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी धानोरा येथे धाव घेतली.त्यातील काही विद्यार्थिनिंची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा मुख्यालयात उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
सोडे येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींची प्रकृर्ती अचानक बिघडल्याने तब्बल ९१ विद्यार्थिनींना धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविले असून सध्या प्रकृर्ती स्थिर असल्याची माहिती येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमणकर यांनी दिली आहे.