गडचिरोली:गेल्या दोन महिन्यांपासून मुलचेरा तालुक्यात वाघाने जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत.या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत असतानाच वाघाने हल्ला चढवत पुन्हा एका वासराचा फडशा पाडला. ही घटना रविवार (३ डिसेंबर) रोजी ४.३० वाजताच्या सुमारास मथुरानगर जवळ घडली.
मथुरानगर येथील शेतकरी श्यामल मंडल यांचे दहा-बारा गाई घेऊन त्यांचा मुलगा शुभ मंडल हा गावालगत असलेल्या जंगलात चराईसाठी गेला होता.गावाकडे परत येत असताना वाघाने गावातील तलाव जवळ वासरावर हल्ला चढवत त्याचा फडशा पाडला. एवढेच नव्हेतर त्याच्या डोळ्यादेखत वारसाला किमान शंभर मीटर पर्यंत फरफटत आणला. रस्त्यालगत जंगल लागून असल्याने अनेकांनी वाघाला पाहिल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
मागील दोन महिन्यांपासून मुलचेरा तालुक्यात वाघाने प्रचंड धुमाकूळ घातला असून विविध ठिकाणी पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असल्याचे दिसून येत आहे.मागील महिन्यात विश्वनाथनगर येथील एका शेतकऱ्यांवर सुद्धा वाघाने हल्ला केला होता.त्याने कसेबसे झाडावर चढण्याचा प्रयत्न करताना त्याच्या दोन्ही पायाला गंभीर जखम झाली.सुदैवाने त्याचे प्राण वाचले.गंभीर अवस्थेत त्याला गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
सध्या तालुक्यातील विविध गावांत दररोज वाघाचे दर्शन होत असल्याचे शेतकरी सांगतात.वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडे यापूर्वीच निवेदन देण्यात आले आहे.मात्र,अजूनपर्यंत वन विभागाने पुढाकार घेतला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.मथुरानगर येथील घटनेची माहिती मिळताच गोमनी चे वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले आहे.या घटनेमुळे श्यामल हरण मंडल या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास वन विभागाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.