सिरोंचा:-स्त्री मध्ये असलेल्या असीम ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन करून ती स्वयंसिद्ध होण्याच्या दृष्टीने वाटचाल केल्यास ‘महिला सक्षमीकरणा’चे ध्येय निश्चितच परिपूर्ततेजवळ जाऊन पोहोचेल,असे प्रतिपादन अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी केले.
‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर राज्य सरकारने हाती घेतलेल्या ‘मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण’ अभियान संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे.त्याअनुषंगाने सिरोंचा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित पहिले महिला सक्षमीकरण अभियानाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार जितेंद्र शिकतोडे,प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.धवल साळवे,संवर्ग विकास अधिकारी घोडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोहर कन्नाके,गटशिक्षणाधिकारी निलकंटम,कृषी अधिकारी बोबडे, नागरपंचयातचे अध्यक्ष फरजाना शेख,उपाध्यक्ष बबलू पाशा,नगरसेविका सपना तोकला, माहेश्वरी पेद्दापल्ली,पद्मा पिल्ली,रंजित गागापूरवार,सतीश भोगे,इम्तियाज खान,सतीश राचर्लावार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आपल्या भारत देशाची लोकसंख्या जवळपास १४० कोटी असून त्यात अर्धी संख्या ही महिलांची आहे.२०४७ पर्यंत भारत देशाला विकसित करण्याचे ठरविले आहे.त्यासाठी पुरुषांसोबत महिलांचाही सक्षमीकरण करणे आवश्यक आहे.त्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज झाले असून जिल्हाभरात विविध ठिकाणी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानातुन महिलांसाठी एकाच मंचावर लोककल्याणकारी योजना देण्यात येणार आहे.त्याअनुषंगाने महिलांनी स्वतःहून पुढाकार घेत योजनांची विस्तृत माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी महिला सक्षमीकरण अभियानाची विस्तृत माहिती देत यापुढे आसरअली,पेंटीपाका, बामणी, सिरोंचा येथे घेण्यात येणाऱ्या मेळाव्याला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोक कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.यावेळी विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते.तर,महिलांना विविध विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात आला.