गडचिरोली: महाराष्ट्र व छत्तीसगड वनविभागाने एटापल्ली वनपरिक्षेत्रात 29 नोव्हेंबरला संयुक्त कारवाई करत वाघाच्या कातडीसह दोघांना ताब्यात घेतले होते. ते सध्या वनकोठडीत आहेत. दरम्यान 30 नोव्हेंबरला या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात वनविभागाला यश आले आहे. विशेष म्हणजे शव आणि दातही हस्तगत करण्यात आले आहे.
29 नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजता एटापल्ली,जीवनगट्टा मार्गावर मोटरसायकल वरून फिरताना शामराव नरोटे (वासामुंडी) आणि अमजद खान पठाण (एटापल्ली) यांना अटक करून त्यांच्याकडून दुचाकीसह वाघाची कातडी, नखे, तीन मोबाईल असा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील कलम 9, 39, 48, 49(अ),49(ब) व 50 अन्वये वन गुन्हा नोंदविण्यात आला. 30 नोव्हेंबरला त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची वनकोठडी सुनावली.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत रामा गावडे व जगन्नाथ मट्टामी यांना 30 नोव्हेंबरला जेरबंद केले. चारही आरोपींनी वाघाच्या हत्येचा कट उलगडला. आरोपींना घेऊन वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले. तिथे वाघाचे शव आढळले.तर, वाघाचे दात घरातून जप्त करण्यात आले.
ही कारवाई वनसंरक्षक एस रमेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक शैलेश मिणा यांच्या नेतृत्वाखाली उदंती सीतानदी टायगर रिझर्व छत्तीसगड वनविभागाचे उपनिदेशक वरून जैन, उपवनसंरक्षक राहुल सिंग तोलिया विभागीय वनाधिकारी गणेश पाटोळे यांच्यासोबत संयुक्तरित्या केली. याप्रकरणी पुढील तपासणी भामरागड चे सहाय्यक वनसंरक्षक अशोक पवार,एटापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सीसी भडके पेडीगुडमचे वनपरिक्षेत्राधिकारी भावना अलोने,पी ए जेणेकर व अतिक्रमण निर्मूलन पथक अधिक तपास करीत आहेत.