गडचिरोली:वाघाच्या कातडीची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती भामरागड वनविभागास मिळाली. त्या माहितीच्या आधारे विशेष पथक तयार करून छत्तीसगड वन विभागाच्या पथकासह संयुक्त कार्यवाही करून वाघाच्या कातडीसह २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.बुधवारी (२९ नोव्हेंबर) रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
सविस्तर माहिती अशी की, वाघाच्या कातडीची तस्करी होणार आहे, अशी माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यावर वन विभाग नजर ठेवून होते.बुधवार (२९ नोव्हेंबर) रोजी पहाटेच्या सुमारास एटापल्ली ते जिवनगट्टा रस्त्यावर सापळा रचून तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.शामराव रमेश नरोटे वय ३० वर्ष रा.वासामुंडी व अमजत खा अमीर खा पठाण वय ३७ वर्ष रा.एटापल्ली या आरोपींना कातडीसह ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कारवाईत आरोपीकडून वाघाची कातडी,हिरोहोंडा मोटारसायकल व तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर वनगुन्हा प्रकरणी आरोपी शामराव रमेश नरोटे व अमजत खा अमीर खा पठाण यांच्याविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४८,४९,ए ४९,बी ५० अन्वये वनगुन्हा क्र.१२/२०२३ दिनांक २९ नव्हेंबर २०२३ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
उपरोक्त कारवाही ही रमेशकुमार वनसंरक्षक,गडचिरोली वनव्रत यांचे मार्गदर्शनाखाली भामरागड वनविभागाचे उप वनसंरक्षक शैलेश मीना व उदंती सितानदी टायगर रिजर्व छत्तीसगड वनविभाग उप निदेशक वरून जैन व चमू यांचेद्वारे संयुक्तरित्या कारवाही करण्यात आली.तर राहुल सिंह टोलिया उप वनसंरक्षक आलापल्ली,गणेश पाटोळे, विभागीय वनअधिकारी दक्षता यांचे सहकार्य लाभले.कारवाईत चरण भेडके वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली, सुशील हलामी, धनिराम पोरेटी व इतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.या प्रकरणी पुढील तपास अशोक पवार सहायक वनसंरक्षक भामरागड यांचे मार्फत सुरू आहे.