गडचिरोली:-जिल्ह्यातील दक्षिण भागातील आलापल्ली येथे एका ३७ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. राकेश फुलचंद कन्नाके (३७) असे मृतकाचे नाव असून टेकडी कॉलनी येथे वास्तव्यास होता.त्याचा आज आलापल्ली गोंड मोहल्ला येथील प्रभाग क्रमांक 5 मध्ये मृतदेह आढळला आहे.
सविस्तर वृत्त असे की, अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील प्रभाग क्रमांक ५ मध्ये मागील १७ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर पर्यंत साई बाबा देवस्थान सेवा समिती द्वारा या ठिकाणी भागवत सप्ताह सुरू आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी भव्य पेंडाल बांधण्यात आले.तीन दिवसांपासून याठिकाणी पेंडाल काढण्याचे काम सुरू होते.आज २९ ऑक्टोबर रोजी काही तरुण पेंडाल काढण्यासाठी आले असता त्यांना सकाळी साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान राकेश कन्नाके चा मृतदेह आढळून आला.या घटनेची माहिती मिळताच अहेरीचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे आपला चमू घेऊन घटनास्थळी दाखल झाले.ही माहिती वाऱ्यासारखी पसरली अन नागरिकांनी एकच गर्दी केली.
पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले आहे.
सदर इसमाच्या डोक्यावर जखम असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून एक चप्पल चिखलात अडकून होता तर दुसरा चप्पल अस्तव्यस्त पडून होता.यावरून घातपात असल्याचा संशय बळावला आहे. अहेरी पोलीस मोका पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.