अहेरी :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात पी एम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आलापल्ली तथा जिमलगट्टा यांच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी आलापल्ली येथे प्राचार्य वैभव बोनगीरवार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन अहेरी चे पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून एपीआय व्ही. बी. चव्हाण, आलापल्ली ग्रामपंचायतचे सरपंच शंकर मेश्राम,सागर बिटीवार सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील श्रीरामवार आदी मान्यवर उपस्थित होते.
भव्य मॅरेथॉन स्पर्धेत विविध गावातील बहुतांश स्पर्धकांनी मोठ्या सहभाग घेतला होता. स्पर्धेत आलापल्ली आणि जिमलगट्टा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.विशेष म्हणजे शासकीय औद्योगिक संस्था, आलापल्ली तर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेसाठी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या कडून स्पर्धकांना टी-शर्ट, ग्लुकोज, फराळ आदींची व्यवस्था करण्यात आली होती.तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जिमलगट्टाच्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याकडून विविध ठिकाणी पिण्याचे पाणी व ग्लुकोज ची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गावंडे, व्ही.एस. तुमसरे, पी.ए. धुळसे,गोलू राजकोंडावार व इतर सर्व तासिका निदेशक वर्ग तसेच सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सफाईकामगार व सुरक्षा रक्षक व प्रशिक्षणार्थी समिती आदींनी परिश्रम घेतले.