अहेरी:गोविंदा पथक थरावर थर लावत एकदा नव्हेतर अनेकदा प्रयत्न करून अखेर दहीहंडी फोडतात.त्यांचा ध्येय निश्चित असतो.प्रचंड आत्मविश्वास आणि प्रयत्न असतात त्यामुळेच ते शक्य होते.म्हणून प्रत्येकाला आपले ध्येय गाठायचे असेल तर स्वतःमध्ये आत्मविश्वास असणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
अहेरी येथील कै. राजे विश्वेश्वरराव महाराज (गांधी) चौक येथे बजरंग दल तथा विश्व हिंदू परिषद द्वारा आयोजित भव्य दहीहंडी स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषद भद्रावती प्रखंडचे अध्यक्ष विवेक सरपटवार तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना भारत मातेचे रक्षण करून देशाला पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे.एकमेकांना साथ देऊन पुढे जायचे आहे.एवढेच नव्हेतर आपल्या गावाला,आपल्या क्षेत्राला पुढे घेऊन जाताना गोविंदा पथक ज्याप्रमाणे एक एक थराला आधार देऊन उंच शिखर गाठतात अगदी त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना एकमेकांना साथ द्यायचा आहे.तेंव्हाच आपल्याला ध्येय गाठता येणार आहे.विशेष म्हणजे गोविंदा पथकात संघ भावना असते,एकमेकांशी संवाद असतो,एकात्मतेची भावना असते अश्याच पद्धतीने एकसंघ होऊन पुढे गेल्यास यश निश्चित आहे,असेही ते म्हणाले.तर सिरोंचा येथील एक प्रसंग आठवण करून देत त्यांनी युवतींना गोविंदा पथकात सहभाग होण्यासाठी आवाहन केले.सोबतच विश्व हिंदू परिषदचे ६० वर्ष पूर्ण झाल्याबद्दलही त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिले.
अहेरी राजनगरीत आयोजित भव्य दहीहंडी स्पर्धेसाठी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचेकडून तब्बल ३१ हजार रुपयांचा पारितोषिक ठेवण्यात आले होते.पारितोषिक पटकाविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता.मात्र,या स्पर्धेत वेंकटरावपेठा येथील जय श्री राम गोविंदा पथकाने पारितोषिक पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी राज नगरीत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.एकंदरीत दरवर्षीप्रमाणे अहेरी राज नगरीत मोठ्या उत्साहाने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.