अहेरी : अहेरी आलापल्ली या रस्त्याची अल्पावधीत दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर बांधकामाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी ३० ऑगस्ट रोजी सार्वजानिक बांधकाम विभागाला निवेदनातून इशारा दिला आहे.
अहेरी-आलापल्ली या मुख्य मार्गाची झालेली दयनीय अवस्था व कंत्राटदाराच्या निकृष्ट बांधकामाबाबत अनेकदा तक्रारी, निवेदन सादर करण्यात आले. मात्र, अद्यापही सदर रस्त्याचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असून रस्त्याची स्थिती पुन्हा दयनीय झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी, महिला भगिनींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या रस्त्यावर अनेकदा अपघात घडून आले असून कंबरदुखीचा त्रास सुरू झाला आहे. या मार्गावर अपघात होणे नित्याचीच बाब झाली आहे.
विशेष म्हणजे त्वरित या रस्त्याच्या कामाला सुरुवात देखील करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.निवेदन देताना ऑटो चालक मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.