अहेरी:तालुक्यातील पोलीस मदत केंद्र मरपल्ली व पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून उमानुर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.
पोलिस मदत केंद्र, मरपल्ली अंतर्गत समाविष्ट उमानुर येथील शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार यांच्या बौद्धिक कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या वैचारिक क्षमतेत वाढ होऊन त्यांच्या विचारात बळ यावे व नक्षल विचारधारेकडे आकर्षित होऊ नये तसेच त्यांना घडत असलेल्या राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक घडामोडी, शासकीय योजना याबाबत अद्यावत माहिती मिळावी तसेच वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची ओढ निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून व उप विभागीय पोलिस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी सुसज्ज सार्वजनिक वाचनालय उभारण्यात आले.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून सध्या जिल्हाभरातील पोलीस स्टेशन, उप पोलीस स्टेशन व पोलीस मदत केंद्रात समाविष्ट गावात “एक गाव एक वाचनालय” हा उपक्रम सुरू आहे. बहुतांश भागात वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी काम सुरू आहे.नुकतेच उमानुर येथील सावित्रीबाई फुले वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.या माध्यमातून सुशिक्षित युवक युवतींना आपल्या गावातच वाचनालय उपलब्ध झाल्याने मोठी अडचण दूर होत आहे.त्यामुळे घरचे काम आटोपल्यावर फावल्या वेळात सुशिक्षित युवक युवतींनी वाचनालयात वेळ घालवावा असे आवाहन येथील प्रभारी अधिकारी संतोष जायभाये यांनी केले.
उद्घाटन झाल्यावर पोलिसांनी कृषी मेळावा घेऊन शेतकऱ्यांना शेतीचे साहित्य व खते वाटप केले.कृषी मेळावा तसेच वाचनालय लोकार्पण सोहळ्याला येथील सरपंच श्रीनिवास गावडे,प्रभारी अधिकारी संतोष जायभाये,पोलीस उप निरक्षक प्रवीण सोनवणे,बापू तोडसाम, अन्वर शेख,आनंदराव तलांडी,किशोर सडमेक,यशवंत डोंगरे,आनंदराव गावडे,मुस्ताक शेख,संदीप कन्नमवार,पोचम बोगटा,राकेश येलकुची,शामराव गावडे,राकेश संपत तसेच उमानुर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.