अहेरी:एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची मंगळवार ( २९ ऑगस्ट) रोजी गणित व इंग्रजी विषयाची क्षमता चाचणी घेण्यात येणार असून एकूण ५०७७ विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी होणार असल्याची माहिती अहेरीचे प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिली.
सदर परीक्षेकरिता ११ शासकीय आश्रमशाळा व १५ अनुदानित आश्रमशाळा अशी एकूण २६ शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. शासकीय आश्रम शाळेतील १९७८ व अनुदानित आश्रम शाळेतील ३०९९ अशी एकूण ५०७७ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर परीक्षेकरिता प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी पर्यवेक्षक म्हणून काम करणार आहेत. तसेच मुख्याध्यापक केंद्रप्रमुख म्हणून कार्य करणार आहेत. वैभव वाघमारे प्रकल्प अधिकारी यांनी सर्व मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांना सदर परीक्षा बाबत सूचना दिलेले आहेत. प्रकल्प स्तरावर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याकरिता सर्वतोपरी उपक्रम राबविण्याचे नियोजन वैभव वाघमारे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
अतिदुर्गम भाग असल्यामुळे येथील गुणवंत विद्यार्थ्यांना एकलव्य पूर्व परीक्षा तयारी करून घेणे, तसेच JEE/NEET परीक्षेची तयारी करून घेण्याकरिता एकलव्य रेसिडेन्सीयल स्कूल येथे प्रशिक्षण वर्गाचे नियोजन प्रकल्प अधिकारी यांनी केलेले आहे हे विशेष.