गडचिरोली:आदिवासी युवक-युवतीमध्ये उत्तम कलागुण, बौद्धिक क्षमता व क्रीडा कौशल्य भरभरून आहे.त्यामुळे याठिकाणी उत्कृष्ट खेळाडूंची खाण असल्याचे प्रतिादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.ते शनिवार (२६ ऑगस्ट) रोजी एटापल्ली तालुका मुख्यालयातील क्रीडा संकुलाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी मंचावर माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आश्रम,माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, रिंकू पापडकर, नगराध्यक्ष दीपयंती पेंदाम, जिल्हा क्रीडा अधिकारी दोंदल, तालुका क्रीडा अधिकारी गाढले,माजी पंचायत समिती सभापती बेबी नरोटे,माजी जि प सदस्य ग्यानकुमारी कौशी, राकॉ चे तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार,पौर्णिमा श्रीरामवार,जितेंद्र टिकले,रामजी कत्तीवार,संभाजी हीचमी,सपना कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना या भागातील युवक युवतीमधील विविध कलागुण बाहेर काढून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.एटापल्ली सारख्या आदिवासीबहुल भागात उत्तम असे खेळाडू आहेत त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यामुळे शिक्षण,आरोग्य,रोजगारसोबतच क्रीडा क्षेत्रातही काम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मत मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले.
तत्पूर्वी मागील वर्षी भूमिपूजन केलेल्या क्रीडा संकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने त्याचे लोकार्पण मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.कोट्यवधी रुपयांच्या निधीतून येथील क्रीडा संकुल बांधकाम करण्यात आले असून याठिकाणी ट्रॅक,संवरक्षन भिंती तसेच आदी विकास कामासाठी आणखी किती निधी लागणार याची माहिती घेऊन लवकरात लवकर आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.