गडचिरोली:- नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून निधीचा विचार न करता सर्वसामान्य नागरिकांना विविध लोककल्याणकारी शासकीय योजनांचा लाभ द्या असे आवाहन कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.25 ऑगस्ट रोजी आलापल्ली येथील वनसंपदा सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली अहेरी आणि भामरागड तालुक्यातील विविध विभागांचा आढावा सभा घेण्यात आली.यावेळी ते बोलत होते.यावेळी मंचावर माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,माजी प स समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे,आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुल सिंग तोलिया, भामरागडचे उपवनसंरक्षक शैलेश मिना आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून पाहिजे तेवढा निधी खेचून आणण्याची ताकद माझ्यात आहे. भविष्यात गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. त्या माध्यमातून आराखडा तयार करण्यात येत आहे. कोणत्या विभागाला किती निधी पाहिजे त्याचा आराखडा द्या असेही त्यांनी आवाहन केले.विकास कामांत विविध विभागांचा सहकार्याची आवश्यकता असून कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले.
दुपारच्या सुमारास घेण्यात आलेल्या आढावासभेत अहेरी आणि भामरागड तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी,प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, एकात्मिक बालविकास प्रकल्प, वनविभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, आदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नामदार आत्राम यांनी अहेरी व भामरागड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सुरू असलेल्या कामांची माहिती घेऊन दर्जेदार आणि त्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू असलेल्या कामांची माहिती घेताना अधिकाऱ्यांची कान उघडणी केली.तर, रस्त्याच्या कामात वनविभागाने अडथळे न आणता सहकार्य करण्याचे आवाहन केले.
एवढेच नव्हे तर ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून जिल्ह्यात नागरिकांना मोठा फायदा झाला. सर्व विभागांनी एकत्र येऊन काम केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याचा नाव झाल्याचे त्यांनी उल्लेख करतानाच यापुढे विकास कामात अशाच प्रकारे प्रत्येक विभागाने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते अल्लापल्ली वनविभागातील वनमजूर, बारमाई मजूर व चौकीदार यांना सायकल व गणवेश किट तसेच लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.