वरोरा: महायोगी श्री अरविंद यांचा योगाभ्यास हा समाजात शांतता निर्माण करण्यासाठी होता. तो हृदयाला आकलन झाला तरच त्यांची दैवीशक्ती समजून घेता येईल असे विचार भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. रमेश पारेलवार यांनी व्यक्त केले.ते स्थानिक श्री अरविंद केंद्रात महायोगी श्री. अरविंद यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे सचिव अमन टेमुर्डे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून श्री. टेमुर्डे यांनी सांगितले की, योगसाधना करण्यासाठी महायोगी श्री अरविंद यांची ईश्वरी कृपा असेल तर योग्य योगसाधना होईल. जीवनात कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयवंत काकडे, प्रास्ताविक ॲड. योगेश डबले, आभार अक्षय पोफळे यांनी मानले. वरोरा येथील अनेक ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.