गडचिरोली:-पावसाळा सुरू झालं की सगळीकडे डासांचा प्रादुर्भाव वाढतो. सिरोंचा तालुक्यातील नरसिंहपल्ली गावात डेंग्यू आजाराने डोकं वर काढल्याने आरोग्य विभागाला प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले होते.रविवार (१३ ऑगस्ट) रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी नरसिंहपल्ली आणि मोयाबीनपेठा गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करतानाच डेंग्यू सारखे आजार रोखण्यासाठी स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश दिले.
मागील काही दिवसापूर्वी सिरोंचा तालुक्यातील मोयाबीनपेठा प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही गावात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे.काही वृत्तपत्रात बातम्या झळकल्यावर जिल्हा हिवताप अधिकारी आपल्या चमुसोबत या परिसरात ठाण मांडून बसले होते.१३ ऑगस्ट रोजी स्वतः सीईओ आयुषी सिंग यांनी या परिसरात भेट देऊन पाहणी करत प्राथमिक आरोग्य केंद्र,जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यलयाला भेट देऊन येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गावात स्वच्छता ठेवण्यासाठी निर्देश देतानाच गावातील नागरिकांना आवाहन केले.
विशेष म्हणजे डासांचा मुक्काम मडकी, चाकांचे टायर्स, खोबऱ्याच्या रिकाम्या वाट्या,पाण्याचे डबके अशा ठिकाणी असतो. या जागा रिकाम्या करून डासांची उत्पत्ती टाळावी, डासनाशक साधनांचा वापर करावा, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा आणि अंगावर ताप काढण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे त्यांनी मार्गदर्शन केले.दरम्यान त्यांनी मोयाबीनपेठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी करून येथे उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांशी संवाद साधला.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन गावात दाखल होताच नागरिकांनी एकच गर्दी केली.विविध ठिकाणी त्यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करताना लोकप्रतिनिधी व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.सीईओ म्हणून पदभार हाती घेताच सिरोंचा तालुक्यातील मोयाबीनपेठा परिसरात त्यांचा हा पहिलाच दौरा होता हे विशेष.