गडचिरोली:-कमलापूर येथे असलेल्या
राज्यातील एकमेव ‘शासकीय हत्तीकॅम्प’ मध्ये पुन्हा एकदा येथील ‘मंगला’ नावाच्या हत्तीने नुकतेच एका दुचाकीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.यापूर्वी २५ जून रोजी एका दुचाकीसोबत फुटबॉल खेळत नुकसान केल्याची घटना घडली होती.त्यानंतर ही दुसरी घटना असून ‘अजित’ नंतर आता ‘मंगला’ हत्तीने सुद्धा रौद्ररुप धारण केल्याने परिसरात ‘मंगला’ नावाची दहशत निर्माण झाली आहे.
राजाराम (खां) येथील भगवंतराव आश्रम शाळेचे शिक्षक एस एस मेश्राम हे ९ ऑगस्ट रोजी दामरंचा परिसरात पालकसंपर्क करून आपल्या शाळेतील तीन विद्यार्थ्यांना दुचाकीवर घेऊन कमलापूर कडे निघाले.सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ते हत्तीकॅम्प परिसरात पोहोचले.मात्र,येथील काही हत्ती समोरच रस्त्यावर आढळल्याने त्यांनी दुचाकी बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना काही अंतरावर दूर गेले.त्यातील एक हत्ती दुचाकी जवळ येऊन दुचाकीला खाली पाडत पायाने आणि सोंडेने जणू फुटबॉल खेळत होता.त्यात दुचाकीचा मोठा नुकसान झाला. हे दृश्य डोळ्यादेखत घडत असताना सुद्धा त्या शिक्षकाला काही करता आले नाही.
कामलापूर हत्तीकॅम्प मध्ये एकूण ८ हत्ती असून सायंकाळच्या सुमारास त्यांना लगतच्या जंगल परिसरात मोकळे सोडतात.यातील अजित नावाचा हत्तीचा याठिकाणी प्रचंड दहशत आहे.त्याने २०१३ मध्ये एका माहूताला पायाखाली चिरडून ठार केले होते.एवढेच नव्हेतर ‘रूपा’ नावाच्या हत्तींनीवर सुद्धा ‘अजित’ ने हल्ला करून घायाळ केला होता. त्यामुळे हत्ती कॅम्प मधील कर्मचारी अजितला हत्तीच्या कळपापासून लांब बांधून ठेवतात.मात्र, मागील काही दिवसापासून ‘मंगला’ नामक हत्तीने आता रौद्ररूप धारण करून धुमाकूळ घातल्याने या परिसरात ये-जा करणाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.कमलापूर ते दामरंचा हे २३ किलोमीटर चे अंतर असून ये-जा करणाऱ्यांना हत्तीकॅम्प परिसर ओलांडूनच जावे लागते.रात्रीच्या सुमारास येथील हत्तींचा या परिसरात मुक्तसंचार असल्याने अश्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
या घटनेची माहिती सदर शिक्षकाने वनविभागाला दिली असून येथील कर्मचाऱ्यांनी पंचनामा केल्याची माहिती आहे. आता वनविभागाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्या शिक्षकाकडून केली जात आहे.
…..अन्यथा २०१३ च्या घटनेची पुनरावृत्ती होणार
शासकीय हत्ती कॅम्प कमलापूर येथे एकूण आठ हत्ती आहेत. मात्र हत्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी एकही पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने या ठिकाणी यापूर्वी तीन हत्तींच्या पिलांचा मृत्यू झाला होता.आता अजित नंतर मंगला हत्तीचा रौद्ररुप बघायला मिळत आहे. नेमका या हत्तीला काय झाला याची योग्य आरोग्य तपासणी करून त्याची काळजी घेणे आवश्यक आहे.अन्यथा पुन्हा एकदा २०१३ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.