गडचिरोली:-बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे नियमित लसीकरणापासून सुटलेले बालके व गरोदर मातांचे संपूर्ण लसीकरण करुन त्यांना संरक्षित करण्याच्या दृष्टीने ‘विशेष मिशन इंद्रधनुष ५.०’ मोहिम राबविली जात आहे. त्याचा शुभारंभ सोमवारी (दि.७) धानोरा तालुक्यातील गोडलवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला.तत्पूर्वी २१ जुलै रोजी जिल्हा स्तरीय टास्क फोर्स समितीची सभा घेऊन युद्ध पातळीवर हे मिशन पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.त्यांनतर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील आरोग्य कर्मचारी हे मिशन पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावल्याचे दिसून येत आहे.
भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे राज्याच्या शेवटच्या टोकावर वसले आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे सर्व गावे छत्तीसगड सीमेवर आहेत.या परिसरात अनेक नदी नाले असून स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही या भागातील नदी-नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही.सध्या पावसाळा असल्याने या भागातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.अश्या परिस्थितीत आरोग्य विभागाकडून ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम ५.०’ पूर्ण करायचे असल्याने येथील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात टाकून तुडुंब भरलेल्या नदी-नाल्यातून गावकऱ्यांनी झाडाचा खोडापासून तयार केलेल्या बोटीतून प्रवास करावा लागत आहे.
लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट विविध उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात अश्याच पद्धतीने विविध गावांत भेटी द्यावे लागतात.८ ऑगस्ट रोजी दोन आरोग्य सेविका आलदंडी गावात लसीकरण करण्यासाठी गेले असता स्वतःचा जीव धोक्यात टाकून तुडुंब भरलेल्या नदीतून जलप्रवास केला.त्यानंतर त्यांनी गाव गाठून लसीकरण मिशन पूर्ण केले.एवढेच नव्हेतर या भागात मलेरियाचे रुग्ण असल्याने त्यांनी रुग्णांवर उपचार केल्याची माहिती आहे.
लाहेरी पलीकडे गुंडेनूर नदीवर बेली ब्रिज चे काम सुरू असलेतरी त्या पलीकडे अजूनही नदी-नाले आहेत.त्या ठिकाणी पुलाचे बांधकाम केल्याशिवाय या भागातील नागरिकांना आणि या भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार नाही.एखाद्यावेळेस गावात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना असा जीवघेणा प्रवास करावा लागत असेल तर या परिसरातील नागरिकांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा.लाहेरी पलिकडे पहाडीवर लष्कर,होडरी, दामनमर्का, कुवाकोडी,पेरमलभट्टी,फोदेवाडा,बिनागुंडा असे अनेक गावे पावसाळ्यात संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतात. याठिकाणी विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० पूर्ण करने म्हणजे आरोग्य विभागापुढे खूप मोठं आव्हानच आहे हे विशेष.