गडचिरोली : लगाम ते आलापल्ली पर्यंतच्या खराब रस्त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाची बस सेवा मिळत नसल्याचे ओरड काही दिवसांपासून सुरू होती. त्यावर लॅायड्स मेटल्स कंपनीने पर्याय शोधत कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूल बस सुरू करण्यात आली. सोमवारी या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.
लॅायड्स मेटल्सच्या अँड एनर्जी लि. या कंपनीकडून लगाम येथे या बससेवेचा शुभारंभ करताना कंपनीचे अधिकारी विनोद कुमार, भाजपचे संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार, लगामचे सरपंच दीपक आत्राम, बोरीचे सरपंच मधुकर वेलादी, डॅा.चरणजितसिंग सलुजा, लिंगाजी दुर्गे, सुरेश गंगाधरीवार, ऋषी पोरतेत,लगाम चे माजी सरपंच मनीष मारटकर, गोविंद बिश्वास आदी मान्यवर उपस्थित होते.
लॅायड्स मेटल्सच्या लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्ता खराब झाल्याचे सांगत विद्यार्थ्यांसाठी एसटी बसेस वेळेवर चालविण्यास एसटी महामंडळाने असमर्थता दर्शविली होती. त्यावर कंपनीने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवून देण्यासाठी आणि घेऊन येण्यासाठी बसफेऱ्या सुरू करण्याचे ठरविले. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचणे शक्य होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. ही बस लगाम ते आलापल्ली मार्गावरील बोरी, लगाम, खमनचेरू, सुभाषनगर, महागाव, कनेपल्ली, अशा सर्व गावातील विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवून देणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांची विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड सुरू होती.त्यावर लॅायड्स मेटल्स कंपनीने पर्याय उपाय शोधून काढल्याने पालकांमधून आनंद व्यक्त केले जात आहे.