गडचिरोली : वातावरणात बदल झाल्यामुळे अनेक आजार बळावतात. अशातच डोळ्यांच्या संसर्गाची साथ पसरली आहे. अनेक घरांत डोळ्यांच्या साथीची लागण झालेले रुग्ण दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जि.प. च्या माजी अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी केले आहे.
मागच्या काही आठवड्यांपासून डोळ्यांची साथ सुरू आहे. जवळपास प्रत्येक डॉक्टरकडे रोजच दोन-चार रुग्ण साथीच्या आजारावरील उपचारासाठी येत असल्याचे सांगण्यात आले. ही साथ ‘कन्जक्टिव्हायटिस’ या डोळ्याच्या विषाणुजन्य आजारामुळे आहे. लवकर तसेच योग्य उपचार व काळजी गरजेची आहे; अन्यथा डोळ्यावर गंभीर व दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. त्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे.
पावसाळ्याच्या दिवसात विविध आजार डोके वर काढतात. सध्या जिल्ह्यातील अनेक गावांत डोळ्यांची साथ पसरत आहे. अनेक घरांमध्ये डोळ्यांतून पाणी येणे, डोळे सुजणे, डोळ्यांची आग होणे ही लक्षणे असलेले रुग्ण दिसून येत आहेत. डोळे येणे हा संसर्गजन्य आजार आहे. डोळे आल्यानंतर रुग्णांनी डोळ्यांना सतत स्वच्छ पाण्याचे धुवावे. इतर व्यक्तींचे रुमाल, टॉवेल, कपडे आदींचा वापर करू नये. डोळ्यांना सतत स्पर्श करू नये. काळा चष्मा वापरावा. सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरात माशा होणार नाही, याची काळजी घ्यावी व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावा, असे आवाहन जि.प. च्या माजी अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी केले.