गडचिरोली:- राज्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातला आहे. सगळीकडेच अतिवृष्टी निर्माण झाली असून गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा पावसाचा आहाकार सुरू आहे. एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर दुसरीकडे अहेरी ते सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा गावाला जोडणारा मुख्य रस्ताच वाहून गेल्याने जवळपास १५ गावांचा संपर्क तुटला आहे.या परिसरातील नागरिकांना गावातून बाहेर पडणे शक्य होत नसल्याने इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.
सिरोंचा तालुक्यातील मात्र,अहेरी तालुक्याचा टोकावर असलेला हा परिसर मागील तीन दिवसंपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे.अहेरी ते रेगुंठा पर्यंत मुख्य रास्ता आहे.मात्र,या रस्त्यावर नदी,नाले तुडुंब भरून असल्याने रहदारी ठप्प झाली आहे.अहेरी तालुक्यातील शेवटचा गाव म्हणून ओळख असलेल्या लंकाचेन गावाजवळील नाल्याला पूर आल्याने पुलालगतचा डांबरी रस्ताच वाहून गेला आहे.त्यामुळे गावकऱ्यांना बाहेर पडणे कठीण झाले आहे.
या परिसरात रेगुंठा, नरसिंहपल्ली, परसेवाडा,कोटापल्ली आणि मोयाबीनपेठा या ग्रामपंचायत अंर्तगत जवळपास १५ गावांचा समावेश आहे.या लोकांना गावातून बाहेर पडण्यासाठी बेजूरपल्ली आणि तेकडा असे आणखी दोन मार्ग आहेत.मात्र मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे.तर काही ठिकाणी रस्ता खचल्याने बाहेर पडणे कठीण झाले आहे.या परिसरात उन्हाळ्यात काही दिवस बससेवा सुरू असते.मात्र,पावसाळ्यात खाजगी वाहनांशीवाय पर्याय नसते.सिरोंचा तालुका मुख्यालय आणि अहेरी कडे येण्यासाठी येथील नागरिक खाजगी वाहनांचा आधार घेत असतात.मात्र,मागील तीन दिवसंपासून हा संपूर्ण परिसर संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
सध्या परसेवाडा जवळील नाल्यावरील पूर ओसारल्याने या मार्गे रहदारी सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र त्या भागातील नागरिकांना लंकाचेन जवळील रस्ता वाहून गेल्याने विविध कामासाठी अहेरी कडे येणं कठीण झाले आहे हे विशेष.