गडचिरोली:- जिल्ह्यात 15 जुलै पासून पावसाचा जोर वाढल्याने पर्लकोटा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे भामरागड सह तालुक्यातील शंभर पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.आलापल्ली-भामरागड मार्गही अनेक ठिकाणी नाल्यांवर पूर आल्यामुळे पूर्णपणे बंद पडला आहे.
पावसाळा सुरू होऊनही गडचिरोली जिल्ह्यात १४ जुलै पर्यंत दमदार पाऊस झाला नव्हता त्यामुळे शेतकरी चिंतेत होते.मात्र, १५ जुलैपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून १७ जुलै पासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. १७ जुलै सोमवारी झालेल्या दमदार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे प्राणहिता, गोदावरी, बांडीया, पामुलगौतम, पर्लकोटा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पर्लकोटा नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने हा मार्ग अक्षरशा बंद झाला आहे.
दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यात जून महिन्यातच ही परिस्थिती पहावयास मिळते.मात्र, यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे आणि दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे यंदा पहिल्यांदाच भामरागड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटला आहे.त्यामुळे आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३० डी वर अनेक छोटे-मोठे नदी-नाले असून ते तुडुंब भरल्यामुळे पूल आणि रपटे पाण्याखाली जात असतात त्यामुळे हा मार्ग अक्षरशः बंद झाला आहे. गडचिरोलीतील दक्षिण भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे हे विशेष.