महेश गुंडेटीवार/गडचिरोली : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया हत्याकांडानंतर देश पातळीवर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. देशाच्या अनेक राज्यात महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणं सुरू झालं होतं. महाराष्ट्रात सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने नेमण्यात आलेल्या महत्त्वाच्या पथकांपैकी एक म्हणजे ‘निर्भया’ पथक.विविध जिल्ह्यात या पथकाची स्थपणा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अहेरी उपविभागातील महत्त्वाचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या अहेरी येथे सुद्धा १५ जुलै रोजी शनिवारी ‘निर्भया’ पथकाची स्थापना करण्यात आली.पोलीस अधीक्षक निलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अतिरिक्त पोलीस अधीक्षक (प्राणहिता) यतीश देशमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड,पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक आरती नरोटे यांनी अहेरी येथील दानशूर चौकात ‘निर्भया’ पथकाची स्थापना केली.
महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत दुर्दैवाने घडल्याच तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा उभी राहावी यासाठी निर्भया पथक व इतर उपक्रमांच्या माध्यमातून महिला सुरक्षिततेसाठी एक अतिशय महत्त्वाचे पाऊल टाकल्याने महिला सुरक्षेच्या कामाला अधिक बळकटी प्राप्त होणार आहे.गडचिरोली जिल्ह्यातही शहरासह ग्रामीण भागात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.सार्वजनिक ठिकाणी महिलांची होणारी छेडछाड रोखण्यासाठी अहेरी पोलीस दलातील ‘निर्भया’ पथक आता काम करणार आहे.
या पथकात महिला पोलीस अधिकारी आरती नरोटे,करिष्मा मोरे आणि महिला पोलीस अंमलदार काम करणार आहेत.या पथकाची स्थापना होताच या पथकामार्फत अहेरी आणि आलापल्ली सारख्या महत्वाच्या शहरात वर्दळीच्या ठिकाणी गस्त घालून कामाला सुरुवात केली आहे. आता महिलांची छेडछाड करणे, पाठलाग करणे, गैरवर्तन करणे, अश्लील हावभाव करत महिलांना त्रास देणे अशा प्रकारच्या घटनांवर या पथकाची करडी नजर राहणार आहे.विशेष म्हणजे शिकणारे मुली,महिला कर्मचाऱ्यांना अश्या संकटांना सामोरे जावे लागते.त्यामुळे या पथकाकडून शाळा,महाविद्यालयात जाऊन मुलींमध्ये जनजागृती व मार्गदर्शन करून निर्भया पथकाचे कामकाज समाजविण्यात आले.एवढेच नव्हेतर पोलिसांचा हेल्पलाईन नंबर तसेच अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकाबाबत माहिती दिली जात आहे.
नुकतेच काही दिवसांपूर्वी आलापल्ली शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली.त्यांनतर समाजातील विविध सामाजिक संघटना आणि महिलांकडून या घटनेचा जाहीर निषेध करत त्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती.त्यामुळे या परिसरात आता अश्या घटना घडणार नाही यासाठी ‘निर्भया’ पथक काम करणार आहे. निर्भया पथक कायद्याचा वचक निर्माण करणार अशी आशा आता महिला आणि मुलींमध्ये निर्माण झाली आहे.
महिला आणि मुलींवर कुठलेही संकट आल्यास त्यांनी न घाबरता ११२ या हेल्पलाईन नंबर वर अथवा दिलेल्या तीन अधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनी नंबर वर कॉल करावे.निर्भया पथक 24 तास आपल्या सेवेत हजर राहणार.
-आरती नरोटे,निर्भया पथक अधिकारी, अहेरी