गडचिरोली:पावसाला सुरुवात झाली. तत्पूर्वी उन्हाळा होता. त्यामुळे भाज्यांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. उत्पादन कमी झाले मात्र,मागणी नेहमीसारखीच आहे. या कारणामुळे भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट चांगलेच कोलमडले आहे.
आलापल्ली येथील भाजी बाजारात भाज्याची आवक जरी कमी नसली तरी दर वाढल्याने ते खरेदीसाठी किरकोळ विक्रेते धजावत नसल्याचे दिसून येत आहे. दररोजच्या जेवणातील भाजीपाला यामुळे हद्दपार होतो की काय असे वाटू लागले आहे. मात्र भाजीपाला अत्यावश्यक असल्याने तो घ्यावा लागत आहे. परंतू पावकिलो ऐवजी अर्धापाव भाजीवर भागविण्याची वेळ आली आहे.भाजीपाला विक्रेते मात्र, भाजीपाल्याचा आवक घटल्याचे सांगितले आहे.
एरव्ही 40 रुपये किलोने मिळणारे टमाटर चक्क 200 रुपये किलो प्रमाणे विकला जात आहे. तर हिरवी मिरची सुद्धा 200 रुपये किलो दराने विक्री होत आहे. वांगे, शिमला मिरची, भेंडी, गवार शेंगा, कारली, चवळीच्या शेंगा,पत्ता कोबी,फुल कोबी आदी भाज्यांच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. फोडणीत चव आणणाऱ्या कोथिंबीरचा दर गगनाला भिडला आहे.
सध्या भाजीपाला बाजारात आलू,कांदे वगळता सर्वच भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहे. टोमॅटो अधिक लालबुंद झाला तर मिरचीच्या तिखटपणासाठी देखील अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागत आहे. आलापल्ली शहरात आज रविवारी आठवडी बाजार असून भाजी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी झली. मात्र भाज्यांचे भाव ऐकून नागरिक भुवया उंचावताना दिसत होते.