भद्रावती: माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित स्पर्धा घेण्यात आली. त्यात संपूर्ण महाराष्ट्रातून ५० हजार ते १ लक्ष लोकसंख्या असलेल्या नगर परिषद गटामध्ये भद्रावती शहराचा ११ वा नागपूर विभागातून द्वितीय क्रमांक तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आलेला आहे. या स्पर्धेअंतर्गत नागरी स्थानिक संस्थांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करून त्यामधील सर्वोत्तम कामगिरी केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मान सोहळा सोमवारी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. सदर स्पर्धेत ५० हजार ते १ लक्ष लोकसंख्येच्या नगर परिषद गटामध्ये नागपूर विभागातून द्वितीय क्रमांक पटकावल्याने नगरपरिषद भद्रावती येथे आनंदाचे वातावरण आहे.
माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत भद्रावती शहराने उत्तम अशी कामगिरी केली असून मागील वर्षीच्या ५१ व्या क्रमांकावरून ११ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विभागात थोड्या गुणामुळे शहराचा प्रथम क्रमांक हुकला असून यावर्षी राहिलेल्या उणीवा पुढील वर्षी पूर्ण करून यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती न. प. भद्रावतीच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांनी दिली.
सदर अभियानांतर्गत वर्षभर शहरात घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन अभियान यशस्वी करण्यास शहरातील सर्व पत्रकार, विविध सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक संघटना व भद्रावती शहरातील नागरिकांनी उत्तम सहकार्य केले. त्यामुळे या यशाचे श्रेय हे भद्रावती शहरातील सर्व नागरिकांचे आहे तसेच यापुढे सुद्धा स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानामध्ये उत्तम कामगिरी करण्याकरिता शहरात अधिकाधिक स्थानिक प्रजातींची झाडे लाऊन त्यांचे देखभाल करणे, प्लास्टिक पिशवी न वापरणे, घरगुती कचऱ्याचे ओला व सुका असे विलगीकरण करणे व शक्य असेल त्यांनी घरीच ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खत तयार करणे, पावसाच्या पाण्याचे साठवणूक व जतन करणे, नवीकरणीय उर्जा स्त्रोतांचा वापर करून उर्जेची बचत करणे, शहरातील जलाशये स्वच्छ ठेवणे इ. कामे करून नगरपरिषदेला असेच सहकार्य करावे असे आवाहन भद्रावती शहराचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले.