गडचिरोली: जिल्ह्यातून कर्नाटक राज्यात गांजा तस्करी होणार असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे मुलचेरा पोलिसांनी सापळा रचून एकाला गांजासह रंगेहाथ अटक केली असून दुसऱ्या आरोपीला चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे अटक करण्यात पोलिसांना यश आला आहे.ही कारवाई शनिवार ३ जून रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुलचेरा पोलिसांनी केली असून दुसऱ्या आरोपीला १० वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिसांनी केली आहे.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात समाविष्ट बंदुकपल्ली येथून बाहेर राज्यात गांजा तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मुलचेरा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला होता.मात्र,आरोपी बंदूकपल्ली गावातून बाहेर पडून चंद्रपूर कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्ससाठी वाट पाहत असताना पोलिसांनी त्याला मुलचेरा गावात अटक केली.पोलिसांनी त्याला खाकीचा दणका दाखवताच अजून एक आरोपी एम एच ३३ टी ३८४१ या ट्रॅव्हल्स मध्ये बसून चंद्रपूर कडे जात असल्याची माहिती त्यांनी दिली.लगेच मुलचेराचे ठाणेदार अशोक भापकर यांनी गोंडपिपरी येथील पोलिसांना नाकाबंदी करण्यास सांगितले.गोंडपिपरी चे ठाणेदार जीवन राजगुरू यांनी जुन्या तहसील कार्यालय समोर नाकाबंदी करत दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले.
मुलचेरा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आनंद सपन मंडल (४८) रा.कर्नाटक असून पोलिसांनी त्याच्याकडून ७ किलो गांजा जप्त केले आहे.तर,गोंडपिपरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अलोक आनंद मंडल (२२) रा.कर्नाटक असे आहे.त्याच्याकडून पोलिसांनी ५ किलो गांजा जप्त केले आहे.विशेष म्हणजे दोन्ही आरोपी बापलेक असून दोघेही विविध जिल्ह्यात पोलिसांचा जाळ्यात अडकले आहेत. दोन्ही ठिकाणी मिळून एकूण १२ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करत असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गांजा पुरवठा करणाऱ्याला अटक करण्याचे पोलिसांपुढे आव्हान
मागील काही दिवसापासून मुलचेरा तालुक्यात गांजा तस्करी होत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईंवरून गांजा तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. मात्र, मुलचेरा तालुक्यात गांजा पुरवठा करणारे कोण ? याचा शोध घेण्याचे आव्हान आता मुलचेरा पोलिसासमोर आहे. याबाबत येथील ठाणेदार अशोक भापकर यांच्याशी संपर्क साधले असता संपूर्ण माहिती देतानाच दोन संशयित आढळल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच आंतरराज्यीय गांजा तस्करी टोळीचा फर्दाफाश होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.