.भामरागड : -तालुक्यातील लाहेरी येथील राजकीय व सामाजिक व्यक्तिमत्त्व, एटापल्ली व भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती तथा गडचिरोली जिल्ह्या कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष स्वर्गीय मालू कोपा बोगामी यांच्या २१व्या स्मृतीदिनानिमित्त कॉंग्रेसच्या दिग्गजांच्या उपस्थितीत बोगामी यांना १०फेब्रुवारी २०२३ ला अभिवादन करून भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार मारोतराव कोवासे हे होते.प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अनुसूचित जमाती प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे महासचिव डॉ.नामदेव किरसान,अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी,माजी आमदार पेंटा रामा तलांडी,सगुणाताई तलांडी,माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव विश्वजीत कोवासे, कॉंग्रेसचे अनुसूचित जाती सेलचे जिल्हा अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, माजी पंचायत समिती सभापती मादी केसा आत्राम, भामरागड नगरपंचायतचे माजी अध्यक्ष राजू वड्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम स्वर्गीय मालू कोपा बोगामी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.तद्नंतर शासकिय आश्रम शाळा लाहेरी येथील विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागतगीतांनी स्वागत करुन सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. स्वर्गीय मालू कोपा बोगामी हे एटापल्ली व भामरागड तालुक्यातील विकासाचे महामेरू कसे होते? त्यांनी या दुर्गम भागाच्या विकासाचा विडा कसा उचलला? अधिकारी व कर्मचारी यांच्यापर्यंत जावून प्रत्यक्ष विकास कसा करता येईल यांची चर्चा बोगामी साहेबांनी करून विकासाचा नियोजन आराखडा आखायचे.एवढेच नाही तर, आदिवासींच्या व परिसरातील नागरिकांच्या न्याय-हक्कासाठी मंत्रालयात लढा देणारे व्यक्तिमत्त्व होते.असे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या.
स्वर्गीय मालू कोपा बोगामी हे शिक्षक ते राजकारण व राजकारणातून समाजकारण करणारे द्रष्ट्ये पुढारी होते.मात्र १० फेब्रुवारी २००२ ला गैरसमजातून त्यांची हत्या करण्यात आली.या घटनेला आज २१ वर्षे पूर्ण झाले.भामरागड परिसर त्यांच्या जाण्याने राजकिय नेतृत्वाने पोरका झाला.राजकिय नेतृत्वाच्या अभावाने भामरागड तालुका अविकसित राहिला.असा सूर मान्यवरांच्या मनोगतातून जाणवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंगारू गावडे यांनी केले.संचालन लीलाधर कसारे यांनी,तर उपस्थितांचे आभार स्व.बोगामी साहेबांची कन्या उज्ज्वला बोगामी हिने मानले.कार्यक्रमाला परिसरातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.