गडचिरोली:-अहेरी तालुक्यातील वेलगुर टोल्याच्या वळणावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. रवी किष्टे (21) रा. परभणी आणि धोंडीपा पवार (अंदाजे 21) रा. नांदेड असे अपघातात ठार झालेल्या युवकांचे नावं असून यातील धोंडीपा पवार हे पोस्ट मास्टर आणि रवी किष्टे हे पोस्ट मॅन आहेत.
प्राप्त माहितीनुसार जिमलगट्टा पोस्ट ऑफिस अंतर्गत येणाऱ्या कम्मासूर येथे मागील चार महिन्यापूर्वी धोंडीपा पवार आणि रवी किष्टे दोघेजण अनुक्रमे पोस्टमास्तर आणि पोस्टमन म्हणून रुजू झाले होते. 29 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत (दोन दिवस) गडचिरोली येथे प्रशिक्षण असल्याने सहा दुचाकी घेऊन इतर सहकार्यांसोबत ते गडचिरोली ला जात होते. पाच दुचाकी समोर निघून गेले होते.धोंडीपा आणि रवी हे दोघे सर्वात शेवटी होते. बराच वेळ पासून ते मागेच असल्याने पुढे गेलेल्या सर्वांनी परत मागे आल्यावर त्यांना आपल्या सहकाऱ्यांचे अपघात झाल्याचे दिसून आले.दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली असावी असा अंदाज त्यांच्या सहकार्याने व्यक्त केला.या घटनेची माहिती मिळताच अहेरी चे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
आलापल्ली ते आष्टी मार्गाची दुरावस्था झाल्याने आणि जड वाहनांचा वर्दळ असल्याने मागील एक वर्षांपासून अल्लापल्ली ते मुलचेरा या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. आलापल्ली ते मुलचेरा मार्गावर मागील काही दिवसापूर्वी नव्याने डांबरीकरण करण्यात आले. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत झाला आहे.असे असले तरी या रस्त्याच्या साईड बंब भरण्यात आले नसल्यामुळे सदर रस्त्यावरून आमने-सामने येणाऱ्या दोन वाहनांना रस्ता क्रॉस करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे दुरुस्तीनंतरही साईड बंबचा कामाअभावी हा रस्ता जीवघेणा ठरत असल्याची ओरड या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दोन्ही साईड लवकरात लवकर भरण्यात यावे अशी मागणीही केली होती. मात्र प्रशासनाचे अक्षरशा दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.