गडचिरोली:- गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या लाहेरी उप पोलीस स्टेशनला भेट देऊन त्यांनी अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिले.
संपूर्ण देशात आज ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. तर दुसरीकडे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी चक्क छत्तीसगड सीमेवर असलेल्या लाहेरी उप पोलीस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली तसेच उपस्थित होडरी, लष्कर,गोपणार, कोयर, गुंडेनूर,मुरंगल आदी अति दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधून नागरिकांची अडचण जाणून घेतली.
विशेष म्हणजे सदर उप पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे गावे ही अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जातात.लाहेरी पासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर छत्तीसगड ची सीमा आहे.त्यामुळे हा परिसर अतिसंवेदनशील मानला जातो.पोलीस अधीक्षक निलोत्पल हे पदभार स्वीकारल्यानंतर अति संवेदनशील भागात असलेल्या पोलीस मदत केंद्र, उप पोलीस स्टेशन ला प्रत्यक्ष भेटी देत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय,गडचिरोली येथे ध्वजारोहण संपन्न होताच त्यांनी चक्क लाहेरी गाठले. या भेटीमुळे येथील अधिकारी व अंमलदार यांचे नक्कीच मनोबल वाढणार आहे.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी यतीश देशमुख, पोलीस मदत केंद्र लाहेरीचे प्रभारी अधिकारी महादेव भालेराव, पोलीस उपनिरीक्षक संतोष काजळे तसेच आदी कर्मचारी उपस्थित होते.